Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष

देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मतदानाचा तिसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. अशा राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत अस

दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
वाढते अपघात चिंताजनक…
निवडणुका आणि लोकांचा सहभाग

देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मतदानाचा तिसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. अशा राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतांना, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक प्रादेशिक पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले आहे. खरंतर निवडणुका सुरू असतांना आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्ष काँगे्रससोबत जाण्यास इच्छूक असल्याचे वक्तव्य केले आहे. खरंतर 2014 मध्ये देशामध्ये राजकीय वातावरण फिरले आणि मोदी नावाचा जप सुरू झाला. त्यामुळे त्या लाटेत अनेक राजकीय पक्षांचा सुपडा साप झाला. त्यामुळे अनेक प्रादेशिक पक्षांनी राजकीय लाट बघून भाजपसोबत जाणे पसंद केले. तर काही राजकीय पक्षांनी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी थेट भाजपसोबत संघर्ष केला. त्याचे परिणाम या पक्षांना गेल्या 10 वर्षांत भोगावे लागले आहे. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाची अवस्था कोणत्या वळणावर आहे,

याची माहिती सर्वांनाच आहे. मात्र तरीही या पक्षांनी राजकीय संघर्ष सोडला नाही. किंवा भाजपसोबत जुळवून घेण्याची भूमिका घेतली नाही. खरंतर शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवातच काँगे्रसपासून केली. जरी त्यांनी 1998-99 मध्ये नवा राजकीय पक्ष काढला असला तरी, त्यांची नाळ काँगे्रसच्या विचारांपासून तुटू शकली नाही. त्यामुळे मध्यतंरीच्या काळात भाजपसोबत जाण्याचा प्रश्‍न आला तेव्हा शरद पवारांनी भाजपसोबत जाणे टाळले. त्यासाठी त्यांनी संघर्षाची वाट धरली. मात्र आजमितीस देशातील राजकीय वातावरण बदलाच्या दिशेने दिसून येत आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष राजकीय लाट आणि जनभावना पाहून निर्णय घेतात. त्यामुळेच अशा वातावरणात शरद पवारांच्या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त होते. कदाचित शरद पवारांचा राजकीय पक्ष देखील काँगे्रसमध्ये विलीन होण्यास इच्छूक असेल, मात्र त्यांनी त्यासंदर्भात पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांसोबत बोलल्यानंतर त्यावर बोलणे योग्य ठरेल असे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात आणि देशात बरीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अनेक ठिकाणी राजकीय निकाल फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँगे्रस पुन्हा एकदा प्रादेशिक पक्षांची मोट बांधून राजकारण करू शकतो, असे संकेत यानिमित्ताने शरद पवारांनी दिले आहेत. खरंतर केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी काँगे्रसने मोठ्या प्रमाणात जागा मिळवणे गरजेचे आहे. मात्र काँगे्रस लढवत असलेल्या जागा विचारात घेता काँगे्रस 200 जागांवर विजयी होवू शकत नाही. मात्र किमान काँगे्रस 100 जागा मिळवल्या तर काँगे्रस आपली ताकद पुन्हा देशात वाढवू शकतो. तसेच 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत अर्धशतक न गाठलेल्या काँगे्रसने किमान शतक गाठले तरी काँगे्रसचा आत्मविश्‍वास उंचावेल शिवाय लोकसभेतील कामगिरी उंचावेल. आणि त्या जोरावर काँगे्रसला अनेक मित्रपक्षांची साथ मिळू शकते. शिवाय शरद पवारांनी 2014 नंतर प्रत्येक वेळेस काँगे्रस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शरद पवारांनी राहुल गांधी यांचे कौतुकच केले आहे. शिवाय राहुल गांधी यांनी सावरकरांवरून केलेल्या वक्तव्यानंतर शरद पवारांनीच पुढाकार घेत राहुल गांधी यांना सावरकरांविषयीचा रोष आपल्याला निवडणुकीत परवडणारा नाही, असा सल्ला दिला होता. शिवाय या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी राहुल गांधी यांचे प्रादेशिक पक्षांसोबतचे संबंध वृद्धीगत होत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष मोठ्या प्रमाणात काँगे्रसकडे आकृष्ट होवू शकतात असेच संकेत यातून दिसून येत आहे. 

COMMENTS