Homeताज्या बातम्यासंपादकीय

पवारांचे संभ्रमाचे राजकारण

देशाच्या राजकारणात एक वजनदार नेते म्हणून नेहमीच राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेण्यात येते. तब्बल अर्धशतक ज्यांनी महाराष्ट्रा

जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
मुंबईतील वाढते प्रदूषण चिंताजनक
काँगे्रसला गळती !

देशाच्या राजकारणात एक वजनदार नेते म्हणून नेहमीच राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेण्यात येते. तब्बल अर्धशतक ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात योगदान दिले त्या पवारांचे राजकारण नेहमीच संभ्रमाचे राहिले आहे. संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात ज्या काँगे्रसने संसदीय संयुक्त समिती अर्थात जेपीसीसाठी राण उठवले त्यावर शंका उपस्थित करून, शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या समितीवर विश्‍वास दाखवला.

खरे म्हणजे राजकीय रणनीती म्हणून काँगे्रसची रणनीती योग्य आहे. जर राजकारणात एखाद्या पक्षाला मात द्यायची असेल, तर त्यांच्या कॅप्टनला नामोहरम केल्यास संपूर्ण टीम गारद होते. त्यामुळे काँगे्रसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. त्याचपद्धतीने आम आदमी पक्षाने देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवर आक्षेप घेत, त्यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. राजकारणाची ही एक रणनीती आहे. मात्र त्याचबरोबर शरद पवारांसह अनेक जण म्हणतात की, देशासमोर अनेक समस्या असून, त्या मांडल्या पाहिजेत. खरं म्हणजे, देशातील महागाईसह अनेक समस्या सोडवण्याची जबाबदारी ही सत्ताधार्‍यांची आहे. महागाईविरोधात, इंधनांच्या दरवाढीविरोधात काँगे्रसने देशभर आंदोलन केले, काँगे्रसने भारत जोडो यात्रा काढत, देशभर जनसंपर्क प्रस्थापित करत, सर्वसामान्यांशी संवाद साधला. त्यामुळे काँगे्रसचे प्रस्थ वाढत असतांना, ते खच्चीकरण करण्याचा डाव एकंदरित शरद पवारांचा दिसून येतो. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे, शरद पवार असो की पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असो, की आपचेे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असो या सर्व विरोधी पक्षांना देशातील विरोधी पक्षांची मोट बांधायची आहे.

मात्र त्याचे नेतृत्व काँगे्रसकडे नको, असाच या तिघांचा होरा आहे. त्यामुळे काँगे्रसची रणनीती कशी फोल आहे, हा दाखवून देण्याचा या सर्वांचा प्रयत्न असतो. आप सोडला तर, राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूलच्या ममता बॅनर्जी या पूर्वाश्रमी काँगे्रसमध्येच होते. असे असतांना, त्यांना काँगे्रस सोबत हवा आहे, मात्र त्यांचे नेतृत्व नको आहे. काँगे्रस या पक्षाला ग्लानी आली असली, त्यांच्या पक्षाला गळती लागली असली, नेते पक्ष सोडून जात असले तरी, या पक्षाला मानणारा कार्यकर्ता प्रत्येक गावा-गावात आजही आहे. फक्त त्या कार्यकर्त्यांला कार्यक्रम देण्याची गरज आहे. त्याला सक्रिय करण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रेने बहुतांशी काम केलेले आहे. तरी देखील आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र विरोधी पक्षांतील एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँगे्रसने नेहमीच काँगे्रसला पाठिंबा देण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रवादी काँगे्रसने नेहमीच विसंगत भूमिका घेत संभ्रमाचे राजकारण केले आहे. सकाळच्या शपथविधीवरून राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून अजूनही पडदा पडलेला नाही. त्यामुळे संभ्रमाचे राजकारण राष्ट्रवादीच्या हिताशी सुसंगत असले तरी, विरोधी पक्षांची मोट बांधणीसाठी अडचणीचे आहे. देशातील सर्वच विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत, विरोधकांना चांगलेच फटकारले. यावरून, तपास यंत्रणांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची सुपीक कल्पना कुणाची होती, हे लपून राहिलेले नाही. खरंतर, तपास यंत्रणांच्या विरोधात संसदेत आवाज उठवायला हवा. मात्र तशी आक्रमक भूमिका राष्ट्रवादीने कधी घेतलीच नाही. एव्हाना अनिल देशमुख, नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर देखील राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या विरोधी अशी प्रखर भूमिका घेतली नाही. त्यामुळे लटका विरोध आणि लटका पाठिंबा या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार अजून किती दिवस संभ्रमाचे राजकारण करणार आहे, हे काळच ठरवेल. 

COMMENTS