महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य ; काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीनाट्य ; काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याकडून सुरू असलेल्या लॉबिंगमुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

भाजपा मालेगाव जिल्हा सोशल मिडिया संयोजकपदी गौरव चंद्रात्रे यांची निवड  
साऊथ सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांचं निधन
ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचे निधन

मुंबई/प्रतिनिधी: संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांच्याकडून सुरू असलेल्या लॉबिंगमुळे नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. निधीवाटपातील नाराजी आणि अन्य काही बाबी त्यांनी ठाकरे यांच्या कानावर घातल्या. महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील सध्या मुंबईच्या दौर्‍यावर आहेत. पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. 

या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत या वेळी चर्चा झाली. याशिवाय, निधी वाटप, राज्यमंत्र्यांचे अधिकार आणि महाविकासआघाडीत नसेलला समन्वय या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या तक्रारी लवकर सोडवाव्यात, असे साकडे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना घातले. वाझे प्रकरणाच्या हाताळणीवरूनही काँग्रेस राज्य सरकारवर नाराज आहे. काँग्रेसने सचिन वाझे प्रकरणात आमची नाहक बदनामी झाली, असे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे समजते. हे प्रकरण सरकारने व्यवस्थितपणे हाताळले नाही. त्यामुळे आमच्यावरही विनाकारण शिंतोडे उडाले, असा नाराजीचा सूर काँग्रेसच्या नेत्यांनी लावला होता. महाविकासआघाडीत काँग्रेस पक्ष नाराज आहे का, असा प्रश्‍न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. त्यावर आव्हाड यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे, मला काँग्रेसच्या नाराजीबाबत माहिती नाही, असे म्हटले; मात्र सरकार म्हणजे घर आहे. घरात थोडासा वाद होणारच. टाळेबंदीसंदर्भात तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेतील. त्याबाबत कुठेही संभ्रम नसेल, असे ते म्हणाले. खासदार संजय राऊत हे नेता आणि पत्रकार अशा दोन भूमिकांमध्ये वावरत असतात. त्यामुळे ते कधीकधी पत्रकारासारखे बोलून जातात, असा चिमटा आव्हाड यांनी काढला. गेल्या काही दिवसांत काँग्रेसने ठाकरे सरकारला दोनदा निर्वाणीचा इशारा दिला आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग यांचे केंद्रात सरकार होते. त्यात शरद पवार मंत्री होते हे विसरता कामा नये. काँग्रेस नेत्यांवर केली जाणारी टीका पक्षाकडून सहन केली जाणार नाही. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या लक्षात ही बाब आणून देणार आहोत. काँग्रेसमुळे सरकार आहे, आम्ही म्हणजे सरकार नाही, हे लक्षात आणून देण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले होते.

COMMENTS