देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवज

देवळाली प्रवरा : महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामध्ये विकसित करण्यात आलेल्या “ट्रॅक्टरचलीत स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित” या कृषि यंत्रास भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट मंजूर करण्यात आले आहे.
या संशोधन कार्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड तसेच डॉ. संजय भांगरे, डॉ. रवीकिरण राठोड आणि इंजि. रोहित गेठे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
हे यंत्र ५५ अश्वशक्ती किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालविता येते. स्पेड नांगर आणि तव्याच्या कुळवाची एकत्रित मशागत करून पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी हे यंत्र उपयुक्त ठरत आहे. या यंत्राच्या वापरामुळे मशागतीसाठी लागणारा वेळ आणि खर्च दोन्हीमध्ये मोठी बचत होत असून एका तासात सुमारे ०.३३ हेक्टर क्षेत्रावर मशागत करता येते. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत या यंत्रामुळे मशागत खर्चात सुमारे ४४ टक्क्यांपर्यंत बचत होत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
“फुले स्पेड नांगर तव्याच्या कुळवासहित” हे यंत्र एकत्रित मशागतीसाठी विकसित करण्यात आले असून राज्यस्तरीय संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठक-२०२५ मध्ये त्यास प्रसारणासाठी शिफारसही करण्यात आली होती.
या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे तसेच भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील उपमहासंचालक (कृषि अभियात्रिकी) डॉ. एस. एन. झा, सहाय्यक महासंचालक डॉ. के. पी. सिंग, केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्था, भोपाळचे संचालक डॉ. सी. आर. मेहता, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प संचालक डॉ. पी. एन. अग्रवाल आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे यांनी संबंधित शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या सर्व स्तरांतून या संशोधन कार्याचे कौतुक होत आहे.

COMMENTS