Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील विवाहिता सुजाता शंकर भोळे (वय 24) हिचा छळ करून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्य

ओम्नी गाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; दोघे जखमी
इस्लामपूर पालिका निवडणूकीत प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला तगडे आव्हान
इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादी-शिवसेनेत किर-किर; भाजपमध्ये उकळ्या

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील विवाहिता सुजाता शंकर भोळे (वय 24) हिचा छळ करून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केल्यानंतर सासरच्या लोकांविरुध्द हुंडाबळी, खून यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सातारा सिव्हिल व पोलीस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, शवविच्छेदन पुणे येथे झाले असून त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.
याप्रसंगी पती शंकर काळूराम भोळे, सासू लीलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाऊ स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. संगमनगर, सातारा) या संशयित आरोपींवर खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सुजाता शंकर भोळे (वय 24, रा. संगमनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सुजाताचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ (वय 48, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजाता हिला आई-वडील नाहीत. तिचा लहानपणापासून चुलत्यांनी सांभाळ केला होता.
धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित शंकर व सुजाता यांचा सन 2016 मध्ये विवाह झाला आहे. संशयित शंकर भोळे याची लॅब आहे. विवाह झाल्यानंतर दीड वर्षांनी त्यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे भोळे कुटुंबिय नाराज झाले. त्यांनी सुजाता हिचा छळ करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान पती शंकर भोळे याला लॅबसाठी व कार घेण्यासाठी सासरच्या मंडळींनी सुजाता हिने माहेरहून 5 लाख रुपये आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. दिवसेंदिवस सासरचे लोक त्रास देवू लागल्याने सुजाताने ही बाब माहेरी व तिच्या मैत्रिणीला सांगितली.
वारंवार त्रास देवू लागल्याने माहेरच्या कुटुंबियांनी सुजाता हिला पुणे येथे सोडले. यावेळी माहेरच्या मंडळींनी बैठक घेवून बोलणी झाल्यानंतर पुन्हा सुजाता हिला नांदवण्यासाठी सातार्‍यात सोडले. अधूनमधून सुजाता हिला सासरचे लोक त्रास देत होते. दि. 20 जानेवारी रोजी पहाटे पती शंकर भोळे याने तक्रारदार यांना फोन केला. त्यावरुन अशी माहिती दिली की, सुजाताला उलट्यांचा त्रास होत असल्याने उपचारासाठी सातारा सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पहाटे हा फोन झाल्यानंतर सकाळी 9 वाजता शंकर याने पुन्हा तक्रारदारांना फोन करुन सांगितले की सुजाताची तब्येत खालावली असून तुम्ही सातारला या, असे सांगितले.
मुलीच्या तब्येतीबाबत फोन झाल्याने पुण्यावरुन माहेरचे लोक सातारला निघाले. तोपर्यंत सुजाताचा मृत्यू झाला असल्याचे माहेरच्या लोकांना समजल्यानंतर त्यांना धक्का बसला. माहेरच्या नातेवाईकांनी सातारा सिव्हीलमध्ये येवून मृतदेहाची पाहणी केली असता सुजाताच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसले. पोलीस गुन्हा दाखल करुन घेत नसल्याने माहेरचे कुटुंबिय आक्रमक बनले.
सुजाता भोळे हिच्या मृत्यूप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलिसांनी शंकर भोळे यांना ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अन्य तिघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात शनिवारी सकाळी सुजाता भोळे यांच्या नातेवाईकांनी त्यांचा पती शंकर भोळे याच्या घरावर मोर्चा काढला. या घटनेची पोलिसांनी व वैद्यकीय अधिकार्‍यांनी योग्य ती माहिती न दिल्याने सुजाता यांना पुण्याला न्यावे लागले. यामध्ये पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला.

COMMENTS