बीड : बीड जिल्ह्याच्या दळणवळण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला खर्या अर्थाने गती देण्यासाठी खा.बजरंग सोनवणे प्रयत्न करत आहेत. केज शहराला वर

बीड : बीड जिल्ह्याच्या दळणवळण, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासाला खर्या अर्थाने गती देण्यासाठी खा.बजरंग सोनवणे प्रयत्न करत आहेत. केज शहराला वर्षानुवर्षे भेडसावणार्या जीवघेण्या वाहतूक कोंडीतून मुक्ती देण्यासाठी ’दक्षिण बायपास’ची उभारणी करावी, या प्रमुख मागणीसाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. पाठोपाठ बीड जिल्ह्याला हवाई नकाशावर आणण्यासाठी बीड विमानतळ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, या मागणीसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
राष्ट्रीय महामार्ग (एनएच 548 डी) हा थेट केज शहराच्या मध्यभागातून जात असल्याने दररोज शेकडो अवजड मालवाहू गाड्या, मोठे कंटेनर आणि इतर वाहनांची प्रचंड रहदारी या रस्त्यावरून सुरू असते. शहराच्या मध्यवर्ती भागातून ही वाहतूक होत असल्याने केजमध्ये दररोज भीषण वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. यामुळे अपघातांची मालिका सुरू असून ध्वनी व वायू प्रदूषणामुळे स्थानिक रहिवासी, व्यापारी, पादचारी आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता पूर्णपणे धोक्यात आली आहे.या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केज शहराच्या दक्षिण बाजूने स्वतंत्र बायपास रस्ता विकसित करण्याची मागणी खा. सोनवणे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खा. सोनवणे यांनी मांडलेली बाजू अत्यंत गांभीर्याने ऐकून घेतली. या बायपासबाबत आवश्यक ते प्राथमिक सर्वेक्षण करण्याचे आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश संबंधित महामार्ग अधिकार्यांना तात्काळ दिले जातील, असे आश्वासन ना. गडकरी यांनी यावेळी दिले. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी हवाई संपर्क (एअर कनेक्टिव्हिटी) अत्यंत आवश्यक आहे. याच धर्तीवर खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन बीड विमानतळाचा प्रश्न ऐरणीवर आणला. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच व्यापार व पर्यटनाच्या दृष्टीने बीड विमानतळ प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होणे अत्यंत गरजेचे आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनीही या प्रकल्पाबाबत सकारात्मक पावले उचलून प्रशासकीय प्रक्रिया सुकर करण्याचे आश्वासन दिले.
बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण आणि दीर्घकालीन विकासासाठी केजचा बायपास आणि बीड विमानतळ हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. केजमधील नागरिकांना सुरक्षितता मिळणे आणि बीडमध्ये उद्योग-व्यापाराच्या नव्या संधी निर्माण होऊन विमानतळ सुरू होणे ही काळाची गरज आहे. या दोन्ही मागण्या केंद्र सरकारकडून लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील. -खा.बजरंग सोनवणे, बीड.

COMMENTS