मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा जून महिन्यात मोठा विराम घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनची वाटचाल जूनच्या मधा
मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा जून महिन्यात मोठा विराम घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी मान्सूनची वाटचाल जूनच्या मधात मंदावली असून, त्यामुळे अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा लांबली आहे. मात्र, हवामान तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत वातावरणात अनुकूल बदल होण्याची शक्यता असून, जूनच्या अखेरीस महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो.
मान्सूनची पश्चिमेकडील शाखा ८ जूनपासून जवळपास रेंगाळल्यासारखी (स्थिरावल्यासारखी) स्थिती आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच देशातील इतर अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. तथापि, मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता सुरुवातीच्या खंडानंतरही नंतरच्या काळात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांच्या माहितीनुसार, २३ जूनपासून वातावरणात बदल होण्याची चिन्हे दिसू शकतात. त्यानंतर २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई, कोकण आणि किनारपट्टी भागात मान्सून अधिक सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर सह्याद्री पर्वत रांगा ओलांडून मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातही पावसाचे आगमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२९ जिल्ह्यांत उकाड्याचा त्रास; शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सुमारे २९ जिल्ह्यांमध्ये उकाड्याचा त्रास वाढला असून, कोकणात दमट हवामानामुळे रात्रीही अस्वस्थता जाणवत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची ठरत आहे. तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मान्सून अद्याप पूर्णपणे स्थिरावलेला नसल्याने घाईघाईने पेरणी केल्यास नुकसान होऊ शकते. पुरेसा आणि सातत्यपूर्ण पाऊस सुरू झाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
देशात पावसाची ३७.८ टक्के तूट आंतरराष्ट्रीय हवामान निरीक्षण संस्थांच्या उपग्रह नोंदीनुसार, विषुववृत्तीय भागातील वातावरणीय प्रणाली अपेक्षित वेगाने सक्रिय झालेली नाही. त्यामुळे भारताकडे आर्द्रता खेचण्याची प्रक्रिया संथ झाली असून, मान्सूनचा वेगही कमी झाला आहे. त्याचवेळी ‘एल निनो’ परिस्थिती विकसित होत असल्याने काही भागांत दीर्घ कोरडे कालखंड आणि असमान पर्जन्यमान दिसून येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १७ जूनपर्यंत देशात केवळ ४६.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या काळातील सरासरी ७४.३ मिलीमीटर आहे. त्यामुळे देशभरात सुमारे ३७.८ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. पूर्व भारतात मेघगर्जना आणि विजांच्या हालचाली वाढत असल्या तरी मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पश्चिम भारतातील अनेक भागांत ढगांची घनता कमी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

COMMENTS