महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर येतांना दिसून येत आहे. नाशिकमधील तथाकथित कॅप्टन अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोष

महाराष्ट्राच्या राजकारणात एकामागून एक आक्षेपार्ह व्हिडिओ बाहेर येतांना दिसून येत आहे. नाशिकमधील तथाकथित कॅप्टन अशोक खरात याला महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर सातत्याने विविध व्हिडिओ समोर येत आहे. नुकताच मंत्री झिरवाळ यांचा व्हिडिओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली असून, याप्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यानंतर झिरवाळ यांची विकेट पडणार असल्याची चर्चा सुरू झाली असली तरी, त्यांची खरंच विकेट पडणार का? हा प्रश्न आहे.
झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये त्यांच्याच रूममध्ये एक महिला दिसून येत आहे. मात्र झिरवळ यांनी ती महिला नसून तो तृतीयपंथीय असल्याचे बोलले जात आहे. मात्र यासेाबतच प्रश्न पडतो, ती महिला असो की, तो तृतीयपंथीय असो, तो त्या ठिकाणी नेमकं काय करतो आहे, ती महिला त्याठिकाणी कशी आली, याचे उत्तर समोर येण्याची खरी गरज आहे. मुळातच एकीकडे झिरवाळ यांच्यामागेच का शुक्लकाष्ट सुरू असल्याची चर्चा सुरू असली तरी, स्वच्छ चारित्र्याच्या व्यक्तीला कशाचीही भीती राहत नाही. मात्र आपले चारित्र्य स्वचछ नसले की, मग त्याचा वापर हितशत्रू करणारच, यात कोणतीही शंका नाही. त्यांच्याच पक्षातील काही हितशत्रू त्यांची विकेट घालवण्यासाठी ठपून बसले आहेत, त्यांची विकेट घेतल्यांनतर आपली वर्णी लागेल, त्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांची विकेट घेण्यासाठी सर्वच बाजूने प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही घडत आहे, ते केवळ एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित नाही; तर संपूर्ण राजकीय संस्कृतीसमोरील एक गंभीर प्रश्न आहे. सत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी, परस्परांतील अविश्वास आणि ‘हितशत्रू’ ही संकल्पना किती खोलवर रुजली आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणून नरहरी झिरवाळ प्रकरण समोर येत आहे. आरोपांची मालिका, व्हिडिओकांड आणि त्यामागील कथित राजकीय कट या सार्यामुळे प्रश्न फक्त एका मंत्र्याच्या वर्तनाचा राहत नाही, तर तो पक्षाच्या अंतर्गत आरोग्याचा आरसा ठरतो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांवर यापूर्वीही गंभीर आरोप झालेले आहेत. काहींना राजीनामे द्यावे लागले, काहींची प्रतिमा मलिन झाली. या पार्श्वभूमीवर झिरवाळ यांच्यावर आलेले संकट हे अपवाद नाही, तर एका मोठ्या प्रवाहाचा भाग असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, सत्तांतरानंतर या प्रकरणांना वेग आला आहे. महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना पद गमवावे लागले, तर दुसरीकडे सत्ताधारी गटातील इतर पक्षांवर तितक्या तीव्रतेने आरोप पुढे येताना दिसत नाहीत. ही विसंगती केवळ योगायोग मानायची का, हा प्रश्न उपस्थित होतो.
झिरवाळ यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांना या ‘बॉम्ब’ची आधीच कल्पना होती, अशी चर्चा आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचेही समोर येते. जर हे खरे असेल, तर याचा अर्थ पक्षांतर्गत काही शक्ती अशा प्रकारचे ‘साहित्य’ तयार ठेवून योग्य वेळी त्याचा वापर करण्यास सज्ज आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु एकमेकांना नामोहरम करण्यासाठी अशा पातळीवर जाणे ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेली पोकळी आणि त्यानंतरची नेतृत्वाची चढाओढ, या संघर्षाला अधिक तीव्र करताना दिसते. अध्यक्षपद, मंत्रिपदे आणि संघटनात्मक नियंत्रण यासाठी सुरू असलेली चढाओढ आता उघडपणे दिसू लागली आहे. झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे करून स्वतःची भूमिका स्पष्ट केली होती. यामुळेच ते काही गटांच्या निशाण्यावर आले का, अशी शंका उपस्थित होते. ‘हितशत्रू’ ही संज्ञा येथे अगदी सुसंगत वाटते-जे बाहेरून आपले भासतात, पण आतून आपल्यालाच कमजोर करण्यासाठी प्रयत्न करतात. या संपूर्ण प्रकरणात नैतिकतेचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीच्या वर्तनावर सार्वजनिक जीवनातील शुचिता अवलंबून असते. शासकीय निवासस्थानी घडलेल्या कथित प्रकारामुळे नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिक आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे आणि राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु केवळ विरोधकांची टीका पुरेशी नाही; सत्ताधार्यांनीही स्वतःच्या घरातील प्रश्नांवर कठोर भूमिका घेणे अपेक्षित आहे. झिरवाळ प्रकरण हे केवळ एका मंत्र्याचे राजकीय भविष्य ठरवणारे ठरणार नाही, तर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यासाठीही निर्णायक ठरू शकते. जर पक्षाने या घटनेतून धडा घेतला नाही, तर गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष यामुळे पक्षाची प्रतिमा अधिकच मलिन होईल. एकामागून एक नेते वादात अडकत असतील, तर त्यामागे केवळ वैयक्तिक चुका नसून संघटनात्मक कमकुवतपणाही कारणीभूत असतो. राजकारणात मतभेद असणे अपरिहार्य आहे; परंतु ते स्वस्थ पद्धतीने हाताळणे ही नेतृत्वाची कसोटी असते. आज मात्र परिस्थिती अशी आहे की, पक्षातीलच काही घटक एकमेकांना संपवण्याच्या तयारीत आहेत, अशी भावना निर्माण होत आहे. ही प्रवृत्ती थांबवली नाही, तर कोणताही पक्ष स्थिर राहू शकत नाही. शेवटी, झिरवाळ प्रकरणातून दोन गोष्टी स्पष्ट होतात. एक म्हणजे, सार्वजनिक जीवनात पारदर्शकता आणि नैतिकता या केवळ घोषवाक्ये नसून त्या आचरणात उतरल्या पाहिजेत. आणि दुसरे म्हणजे, पक्षांतर्गत एकात्मता नसल्यास बाह्य विरोधकांपेक्षा ‘हितशत्रू’ अधिक घातक ठरतात. महाराष्ट्राच्या राजकारणाने या वास्तवाचा गांभीर्याने विचार करण्याची हीच वेळ आहे.

COMMENTS