बीड : पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय १२ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत बीड जिल्हा संघाने उल्लेखन

बीड : पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे झालेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय १२ वर्षांखालील रग्बी स्पर्धेत बीड जिल्हा संघाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यभरात आपला ठसा उमटवला. या यशामध्ये माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा असून त्यांच्या उत्कृष्ट खेळामुळे बीड जिल्ह्याला अभिमानास्पद यश मिळाले आहे.
स्पर्धेत मुलांच्या संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक आणि संघभावनेचा खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात दमदार लढत देत बीड जिल्ह्याने महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आणि रौप्यपदकावर नाव कोरले. दुसरीकडे मुलींच्या संघानेही स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत राज्यात चौथा क्रमांक मिळवून बीडच्या क्रीडा परंपरेला साजेशी कामगिरी केली.
मुलांच्या रौप्यपदक विजेत्या संघात माईलस्टोन स्कूलचे यश बनसोडे, स्वराज जाधव, तेजस नरवडे, अर्णव शिंदे आणि साई चौरे यांनी उत्कृष्ट समन्वय व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. त्यांना शुभम घोडके, वेदांत घोडके, आर्यन लाखूटे, ऋषिकेश नरवडे, शिवम डंबरे आणि समर्थ वनवे यांची भक्कम साथ लाभली. मुलींच्या संघात माईलस्टोनच्या अनुष्का भिसे, ईश्वरी गुरसाळे, नीरजा तांबे, ओवी नरवडे, शरयू शेळके आणि आयुष्य कुलकर्णी यांनी आपल्या जोशपूर्ण खेळाने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांना प्रज्ञा वाघमारे, श्रेया वाघ, श्रावणी हाटवटे, अमृता इंगोले, श्रद्धा पिंगळे, समृद्धी जटाळ आणि अस्मिता गवळी यांनी प्रभावी साथ दिली.
या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शोएब खाटीक यांच्यासह अशोक चौरे, नितीन येळवे, प्रकाश शिंदे आणि सोनाली शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांच्या योग्य नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमामुळे बीड जिल्ह्याला हे ऐतिहासिक यश मिळाले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शंकर पवळ, सचिव ज्ञानेश्वर तांबे, उपाध्यक्ष नम्रता भानुसे, मुख्याध्यापिका सारिका जगताप तसेच बीड जिल्हा रग्बी संघटनेचे अध्यक्ष शेख इसाक, उपाध्यक्ष रमेश सानप, कोषाध्यक्ष हरिभाऊ बांगर, सचिव महेश घुले आणि कार्याध्यक्ष नितीन येळवे यांनी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
“केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही आमचे विद्यार्थी महाराष्ट्रात अव्वल असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. मुलांचे रौप्यपदक आणि मुलींचा चौथा क्रमांक हा त्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि क्रीडा शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनाचा परिणाम आहे.” – ज्ञानेश्वर तांबे, सचिव, माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल

COMMENTS