देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपरफुटी प्रकरणाने आता महाराष्ट्रातील तथाकथित ‘शैक्षणिक मॉडेल’च्या नैतिकतेलाच हादरा दिला आहे. वैद्यकीय प्रवेश पर

देशभरात खळबळ उडवून देणार्या नीट पेपरफुटी प्रकरणाने आता महाराष्ट्रातील तथाकथित ‘शैक्षणिक मॉडेल’च्या नैतिकतेलाच हादरा दिला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (उइख) ताब्यात घेतल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे म्हणून मिरवणारे कोचिंग क्लासेस आता भविष्य विकणार्या फॅक्टर्या ठरत आहेत का? असा संतप्त सवाल समाजातून उपस्थित होत आहे.
रविवारी दुपारी सुरू झालेली मोटेगावकर यांची चौकशी तब्बल 8 ते 10 तास सुरू होती. यापूर्वी दोन दिवसांपूर्वी सीबीआयने आरसीसीच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली होती. चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि काही संशयास्पद बाबी समोर आल्याने अखेर मोटेगावकर यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत अटकेची घोषणा अद्याप झाली नसली तरी या कारवाईने संपूर्ण राज्यातील कोचिंग व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात आधीच अटकेत असलेले रसायनशास्त्राचे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीतून मोटेगावकर यांचे नाव पुढे आल्याचे समजते. कुलकर्णी आणि मोटेगावकर दोघेही रसायनशास्त्र शिकवत असल्याने त्यांच्या संबंधांचा तपास सीबीआयकडून सुरू आहे. तपास यंत्रणांच्या मते, नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचे काही धागेदोरे लातूरमधील कोचिंग नेटवर्कशी जोडले गेले आहेत. दरम्यान, एका पालकाने गंभीर आरोप करत आरसीसी कोचिंगमधून नीट परीक्षेतील तब्बल 42 प्रश्न आधीच शिकवण्यात आल्याची तक्रार केली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांसह सीबीआयने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. देशभरातून वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आकर्षित करणार्या लातूर पॅटर्नच्या चमकदार प्रतिमेमागे नेमके काय सुरू होते? याची चौकशी आता राष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे. लातूरमध्ये गेल्या काही वर्षांत शिक्षणापेक्षा ‘रिझल्टचा बाजार’ अधिक फोफावल्याचा आरोप वारंवार होत होता. विद्यार्थ्यांच्या यशाचे भलेमोठे बॅनर, एअरकंडिशन्ड क्लासरूम, लाखोंचे शुल्क, राज्याबाहेरील शिक्षकांची फौज आणि रँकच्या जाहिराती यामधून शिक्षणाचे व्यापारीकरण उघडपणे दिसत होते. शंभर टक्के यश आणि टॉपर्सची फॅक्टरी अशा घोषणांनी पालकांना आकर्षित करणार्या या कोचिंग संस्कृतीने विद्यार्थ्यांवर मानसिक, आर्थिक आणि स्पर्धात्मक ताण निर्माण केला असल्याची टीका शिक्षणतज्ज्ञ सातत्याने करत आले आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचल्याने आणखी खळबळ उडाली आहे. सीबीआयच्या विशेष पथकाने शनिवारी नांदेड शहरातील विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकून तब्बल सात ते आठ तास चौकशी केली. संबंधित कुटुंबाने आपल्या मुलीसाठी लाखो रुपयांत नीटची प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कारवाईनंतर नांदेडमधील शैक्षणिक वर्तुळात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, नांदेडमधील आरसीसी कोचिंग क्लासेसच्या दोन्ही कार्यालयांना रविवारी अचानक टाळे लावण्यात आले. कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी नेहमीप्रमाणे कोचिंगसाठी आलेल्या हजारो विद्यार्थ्यांना आज सुट्टी आहे असे सांगून परत पाठवण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती, संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वसामान्य पालकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे – मुलांच्या भविष्यासाठी लाखो रुपये मोजून कोचिंग क्लासेसमध्ये पाठवणार्या पालकांना नेमके काय मिळत आहे? गुणवत्तापूर्ण शिक्षण की भ्रष्ट व्यवस्थेचे जाळे? नीटसारख्या राष्ट्रीय परीक्षांमध्ये जर प्रश्नपत्रिका विक्रीचा बाजार उभा राहत असेल, तर प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे काय? ग्रामीण भागातून कष्टाने पुढे येणार्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची किंमत कोण मोजणार? हा केवळ पेपरफुटीचा गुन्हा नसून देशातील शिक्षण व्यवस्थेच्या नैतिक दिवाळखोरीचा आरसा असल्याची तीव्र प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहे. सीबीआयचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे – शिक्षणाच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या कोट्यवधींच्या कोचिंग साम्राज्यावर आता कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS