Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

खरात प्रकरणातील महत्वाचा साक्षीदाराचा अपघातात ठारशिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके व पत्नीचा मृत्यू

मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार असलेले शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघातात

अशोक खरात प्रकरणाच्या तपासाला नवी गती; उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती
अशोक खरातच्या कोठडीत वाढ, चौदावा गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरातचा ताबा ईडीकडे


मुंबई : भोंदू अशोक खरात प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार असलेले शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा शुक्रवारी दुपारी भीषण अपघातात मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर त्यांच्या कारने उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, डॉ. शेळके हे कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात होते. दुपारी सुमारे एकच्या सुमारास धोत्रे गावाजवळ त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की, कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातानंतर काही काळ कार कंटेनरखालीच अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मात्र, कारमध्ये अडकलेल्या शेळके दाम्पत्याचा तोपर्यंत मृत्यू झाला होता. जखमी मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण डॉ. शेळके हे भोंदू अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांची अनेक वेळा चौकशी केली होती आणि त्यांचा जबाबही नोंदवण्यात आला होता. त्यामुळे या घटनेबाबत केवळ अपघात की घातपात, याबाबत विविध स्तरांतून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
डॉ. शेळके हे अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जात होते. ते शिवनिका ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. संबंधित प्रकरणात आर्थिक अनियमितता आणि देणग्यांच्या वापराबाबत वाद निर्माण झाल्यानंतर या ट्रस्टची चौकशी सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर शेळके यांची भूमिका महत्त्वाची मानली जात होती. शिवनिका ट्रस्टमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर देणग्या जमा झाल्या होत्या. गोशाळा प्रकल्पासाठी निधी उभारण्यात आला असला, तरी प्रत्यक्ष काम पूर्ण झाले नसल्याने विश्‍वस्तांमध्ये मतभेद निर्माण झाले. या वादातून काही सदस्यांनी राजीनामे दिले होते. सध्या ट्रस्टमध्ये अध्यक्ष म्हणून अशोक खरात, तर सरचिटणीस म्हणून कल्पना खरात कार्यरत आहेत. याशिवाय रुपाली चाकणकर, सुभाष गमे, ललित पोफळे आणि डॉ. नंदकिशोर कातोरे हे विश्‍वस्त मंडळावर आहेत. या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे येत असून, पोलिसांनीही सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली आहे. घटना अपघाती असली तरी, त्यामागील परिस्थिती आणि पार्श्‍वभूमी लक्षात घेता तपासाचा कक्षा अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.

COMMENTS