Homeताज्या बातम्यासंपादकीय

कौल कुणाला ?

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पक्षफुटीच्या घडना घडल्या आहेत, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणांचा पुरता विचका झाला आहे. असे असतांना, काही महिन्य

अपघातांची वाढती संख्या
काँगे्रससमोर पक्षफुटीचे आव्हान
वंचितांचा नायक  

महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पक्षफुटीच्या घडना घडल्या आहेत, त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणांचा पुरता विचका झाला आहे. असे असतांना, काही महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे या निवडणुकीमध्ये नेमके कोण बाजी मारणार, यावर चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. नुकताच एक सर्व्हे जाहीर करण्यात आला असून, या सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल. विरोधकांच्या या आघाडीला सत्ताधारी महायुतीपेक्षा 4 टक्के जादा मते मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आल्यामुळे सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात एकच खळबळ माजली आहे. या सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर सत्ताधारी महायुतीला अवघ्या 19 ते 21 जागांवर समाधान मानावे लागेल. इतर पक्षांच्या वाट्याला 0 ते 2 जागा जातील. मतांच्या टक्केवारीतही या निवडणुकीत महाविकास आघाडी वरचढ ठरण्याचा दावा या सर्व्हेत करण्यात आला आहे. त्यानुसार, मविआला 41, तर महायुतीला 37 टक्के मतदान पडेल. तर 22 टक्के मते इतर पक्षांत विभागली जातील. खरंतर हा अंदाज आजचा असला तरी, पुढील राजकारणाची स्क्रिट अजून ठरायची आहे. भाजपने ज्यापद्धतीने महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले आहे, त्यानुसार बघता, भाजपने पुढील अनेक दशकांचे राजकारण महाराष्ट्रात पेरून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने ज्यापद्धतीने शिंदे गटाला सोबत घेत, उद्धव ठाकरे गटाचे पानीपत केले, त्यावरून भाजप हिंदूत्ववादी पक्ष म्हणून एकटाच मिरवू इच्छितो, हे देखील यातून स्पष्ट होते. शिवाय भाजपच हिंदुत्वाचे राजकारण करू शकतो, हिंदूंना न्याय देवू शकतो, हा संदेश पोहचवण्यात भाजप बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. अर्थात उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये गेल्यानंतरच भाजप हा संदेश व्यवस्थितरित्या पोहचवू शकला आहे. जोपर्यंत उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तोपर्यंत कडवा हिंदूत्वाचा चेहरा म्हणून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे बघितले जात होते. मात्र हिंदूत्वाचा चेहरा म्हणून ना शिंदेंकडे बघितले जाते, ना ठाकरेंकडे, तर हिंदूत्वाचा चेहरा म्हणून भाजप आपले लक्ष वेधून घेतो. त्याचप्रमाणे भाजपच्या हिंदुत्वाला औपचारिक विरोध करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर या पक्षाची एकहाती ताकद संपलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आजच्या सर्व्हेनुसार जरी महाविकास आघाडीला बहुमत प्राप्त होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी, महाविकास आघाडीतच जागा वाटपावरून मारा-मारी होण्याची शक्यता आहे. यासोबतच शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या ज्या याचिका आणि निकाल प्रलंबित आहेत, त्यानंतर निवडणुकीचा अंदाज व्यक्त करता येणार आहे. तोपर्यंत कोणता पक्ष विजयी होईल, याचा अंदाज बांधता येत नाही. आमदार अपात्रतेची याचिका निकाली निघाल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतो, राष्ट्रवादी काँगे्रस कुणाची, यासोबतच लोकसभा निवडणुकीत अजित पवार गट, शिंदे गट कोणत्या पक्षचिन्हावर निवडणूक लढवतात, यावरच पुढील निकाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला संभ्रमात ठेवण्यासाठीच तर हा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही ना, अशी शंका देखील वाटायला लागते. कारण भाजपने सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे चार-पाच लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार सभा, वातावरण निर्मिती सुरू आहे. याउलट ठाकरे गटाच्या, शिंदे गटाच्या म्हणाव्या तशा अजूनही सभा वातावरणनिर्मिती सुरू नाही. शरद पवारांनी काही सभा घेतल्यानंतर ते देखील शांत आहे, तर काँगे्रसचे अजून कोणतीच मोर्चेबांधणी नाही, त्यामुळे आत्ताच अंदाज वर्तवणे योग्य नाही. वातावरण निवळल्यानंतरच असा अंदाज वर्तवणे योग्य ठरणार आहे.

COMMENTS