नांदेड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून रस्ते मोकळे ठेवण्यासाठी नांदेड शहर पोलीस दलाने शनिवारी अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम र

नांदेड : शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून रस्ते मोकळे ठेवण्यासाठी नांदेड शहर पोलीस दलाने शनिवारी अतिक्रमण व अवैध पार्किंगविरोधात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत विविध ठिकाणांवरील अतिक्रमणे हटविण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण 53 प्रकरणे नोंदवून 51 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, आरसीपी (ठउझ) पथक तसेच नांदेड महानगरपालिकेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाईत सहभाग घेतला. ही मोहीम सकाळी 11 ते दुपारी 2.30 आणि सायंकाळी 4 ते रात्री 7 या दोन सत्रांत राबविण्यात आली. वजिराबाद चौक, महावीर चौक, जुना मोंढा, भगतसिंग चौक, गुरुद्वारा चौक, चिखलवाडी कॉर्नर आदी प्रमुख मार्गांवर रस्त्यावरील अतिक्रमणे, हातगाड्या, फळ विक्रेते, टपर्या तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे इतर अडथळे हटविण्यात आले. तसेच चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणार्यांवर मोटार वाहन कायदा व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी नांदेड पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणे किंवा अवैध पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्यास यापुढेही अशाच प्रकारची कठोर कायदेशीर कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

COMMENTS