Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंबगाव ते तळणी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची गैरसोय

नांदेड । प्रतिनिधीनांदेड जिल्ह्यातील लिंबगाव ते तळणी या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत.

नांदेड-वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड महापौरपदाची रंगतदार चढाओढ : महिलाराज की राजकीय डावपेच
महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई

नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव ते तळणी या मुख्य रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, नागरिकांचे हाल दिवसेंदिवस वाढत आहेत. एकेकाळी सुस्थितीत असलेला हा रस्ता आता मोठमोठ्या खड्ड्यांनी भरलेला असून, प्रवास करताना वाहनधारकांना अक्षरशः आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की, हा मार्ग रस्ता न राहता खड्ड्यांचे जाळेच बनला असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
लिंबगाव परिसर हा मोसंबी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, या भागात रेल्वे स्टेशन, शासकीय रुग्णालय, बँका, पशुवैद्यकीय दवाखाना तसेच विविध शासकीय कार्यालये आहेत. आजूबाजूच्या पाच ते दहा गावांतील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर लिंबगाववर अवलंबून आहेत. मात्र, मुख्य रस्त्याची दुरवस्था झाल्याने या सर्व व्यवहारांवर विपरीत परिणाम होत आहे. शेतकर्‍यांना शेतमाल बाजारात पोहोचवताना अडचणी येत असून, रुग्णांना रुग्णालयात नेणेही कठीण झाले आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. विशेषतः रात्री-अपरात्री प्रसुतीसाठी किंवा आपत्कालीन उपचारांसाठी महिलांना रुग्णालयात नेताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे बसणार्‍या धक्क्यांमुळे रुग्णांचा त्रास अधिकच वाढत आहे. याशिवाय, या मार्गावरून रोज प्रवास करणार्‍या अनेक नागरिकांना कंबरदुखी, मानदुखी व मणक्यांचे आजार जडत आहेत. सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. अरुंद आणि खराब रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली असून, मोठी वाहने खड्ड्यांत अडकणे किंवा उलटण्याच्या घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शालेय विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना पायी चालणेही धोकादायक बनले आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. लिंबगाव, धानोरा आणि तळणी परिसरातील नागरिकांनी या मार्गाची तातडीने डागडुजी करून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS