श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'साहित्यिक

श्रीरामपूर : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘साहित्यिक फेरफटका’ हे पुस्तक कर्मवीर चरणी अर्पण करून ऋणात्मक मानवंदना देणे हा स्तुत्य साहित्यिक उपक्रम असल्याचे मत माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गाजरे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या श्रीरामपूर कर्मवीर चौकातील पुतळापूजन व साहित्यिक मानवंदना उपक्रम संपन्न झाला, यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपले नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कर्मवीर चरणी अर्पण केले. यावेळी प्राचार्य डॉ. शंकरराव गाजरे यांनी साहित्यिक फेरफटका पुस्तकाचे कौतुक केले. कर्मवीरांच्या कार्याला ही शब्द पुष्पांजली भूषणावह आहे. डॉ. उपाध्ये यांनी त्यांचा १९९५ चा ‘निवडुंगाची फुले’ हा पहिला कवितासंग्रह अर्पण केला होता.
प्राचार्य डॉ. गाजरे म्हणाले, कर्मवीर जन्मले, त्यांनी रयत शिक्षण संस्था ०४ ऑक्टोबर १९१९ रोजी सुरू केली, म्हणून गोरगरिबांचे शिक्षण झाले, गरीब रयतेला जीवनाची दिशा मिळाली, माणूस म्हणून सन्मान लाभला, असे सांगून प्राचार्य डॉ. गाजरे यांनी आपले जीवन व कर्मवीर विचार सांगितले. प्राचार्य टी. ई. शेळके यांनी कर्मवीरांच्या त्यागाचा वसा आणि वारसा जपणे हीच खरी त्यांना मानवंदना आहे, असे सांगून आपला खुंटेगाव आणि श्रीरामपूर हा जीवनप्रवास त्यांनी कथन केला.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कर्मवीरांमुळेच सर्व सामान्य रयतेचे भले झाले, कर्मवीरांची शिक्षण संस्था म्हणजे त्यागाची, ज्ञानाची, श्रमाची, विवेकाची आणि सेवेची पंचसूत्री आहे, २२ सप्टेंबर १८८७ रोजी जन्मलेले भाऊराव पाटील यांचे ९ मे १९५९ रोजी निधन झाले, त्यांचे कार्य अमर आहे. रयतेने हा आदर्श मनीमानसी जपला पाहिजे असे सांगून आपली साहित्यसंपदा कर्मवीरांच्या पुतळ्याला अर्पण करून अभिवादन केले.

COMMENTS