कोल्हापूर : आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रीपदे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये

कोल्हापूर : आरोग्य क्षेत्राशी संबंधित असणारे राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अशी दोन मंत्रीपदे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. करवीर पोलिसांनी कदमवाडी येथील ‘प्रतिमा हॉस्पिटल’वर धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत धक्कादायक बाब अशी की, राज्याच्या आरोग्य विभागात सिव्हिल सर्जन आणि सहाय्यक संचालक म्हणून काम केलेले डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड हेच या बेकायदेशीर काळ्या धंद्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.
कोल्हापुरात नुकताच २६ जुलै रोजी कळंबा येथील “थ्री स्टार लॉजिंग”वर छापा टाकण्यात आला होता. तिथे अवैध गर्भलिंग चाचणी करताना संशयित स्वप्नील पाटील आणि दोन महिला एजंटना पकडण्यात आले होते. यातील एजंट अश्विनी शिंदे हिच्या चौकशीतून पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. ज्या महिलांच्या गर्भात ‘मुलगी’ असल्याचे निष्पन्न व्हायचे, अशा महिलांना अश्विनी शिंदे ही कदमवाडीतील भीमनगर हाऊसिंग सोसायटीत असलेल्या डॉ. गायकवाड यांच्या ‘प्रतिमा हॉस्पिटल’मध्ये गर्भपातासाठी पाठवत असे.
मिळालेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपाधीक्षक आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक धाडसी योजना आखली. पोलिसांनी एक बनावट रुग्ण तयार करून प्रतिमा हॉस्पिटलमध्ये पाठवला. डॉ. गायकवाड यांनी कोणत्याही अधिकृत कागदपत्रांची किंवा केसपेपरची पूर्तता न करता या रुग्णाला तातडीने अॅडमिट करून घेतले. इतकेच नव्हे तर, त्यांनी स्वतःकडील बेकायदेशीर पोर्टेबल सोनोग्राफी मशिनद्वारे तपासणी करून गर्भपाताची तयारी दर्शवली आणि रुग्णाला गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा टाकून डॉक्टरांना रंगेहाथ पकडले.
डॉ. चंद्रकांत गायकवाड यांची पार्श्वभूमी अत्यंत धक्कादायक आहे. ते केवळ खाजगी डॉक्टर नसून त्यांनी शासकीय सेवेत अत्यंत वरिष्ठ पदांवर काम केले आहे. त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि बीड या जिल्ह्यांत सिव्हिल सर्जन म्हणून काम केले होते. तसेच ते मुंबईतील सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त अधीक्षक होते आणि पुणे येथून सहाय्यक संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. इतक्या जबाबदार पदावर राहिलेल्या व्यक्तीने सेवानिवृत्तीनंतर गांधीनगर, सोळांकूर, हातकणंगले आणि इतर शहरांतही अशा प्रकारची अवैध कृत्ये केल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
पोलिसांनी घटनास्थळावरून पोर्टेबल सोनोग्राफी मशिन, गर्भपातासाठी वापरली जाणारी घातक उपकरणे आणि औषधे जप्त केली आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम आणि पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अटकेची प्रक्रिया सुरू असताना प्रकृती खालावल्यामुळे डॉ. गायकवाड यांना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासो पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे. तर या रॅकेटमध्ये आणखी किती डॉक्टरांचे हात गुंतले आहेत, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

COMMENTS