राहुरी : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील कोळेवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय विवाहित महिलेने आपल

राहुरी : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील कोळेवाडी परिसरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाचा गळफास देऊन जीव घेतला आणि त्यानंतर स्वतःही राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
आशा सूर्यभान आंबेकर (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, शिवांश सूर्यभान आंबेकर (वय दीड वर्ष) असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजण्यापूर्वी घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशा आंबेकर या घरात एकट्याच असताना त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले. काही वेळानंतर हा प्रकार शेजाऱ्यांच्या व नातेवािकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दरम्यान, राहुरी तालुक्यातील वाढती गुन्हेगारी आणि अशा प्रकारच्या मानसिकतेच्या घटनांमुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत असून, नवे पोलीस निरीक्षक या परिस्थितीला कशा पद्धतीने आळा घालतात, याकडे राहुरीकरांचे लक्ष लागले आहे. पोलिसांनी या आत्महत्येप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS