चेन्नई : आयपीएल 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रभावी कामगिरी

चेन्नई : आयपीएल 2026 मधील महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने प्रभावी कामगिरी करत मुंबईवर आठ गडी राखून सहज विजय मिळवला. या पराभवामुळे मुंबईची गुणतालिकेतील स्थिती अधिकच कठीण झाली असून, पुढील फेरीत पोहोचण्याची शक्यता आता अत्यंत क्षीण झाली आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणार्या मुंबई संघाने या हंगामात अपेक्षित सातत्य दाखवण्यात अपयश आले. चेन्नईविरुद्धच्या या सामन्यातही फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईला सात गडी गमावत केवळ 159 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर विल जॅक्स अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यानंतर रायन रिकल्टनने थोडा वेळ डाव सावरण्याचा प्रयत्न करत 24 चेंडूंमध्ये 37 धावा केल्या. नमन धीरने जीवदानाचा फायदा घेत आक्रमक खेळी करत चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 37 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांनी साथ न दिल्यामुळे मुंबईचा डाव मोठ्या धावसंख्येकडे जाऊ शकला नाही. चेन्नईकडून गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा केला. अंशुल कंबोजने अचूक टप्प्यावर चेंडू टाकत तीन बळी मिळवले. पदार्पण करणार्या रामकृष्ण घोषनेही प्रभावी गोलंदाजी करत तीन बळी घेत मुंबईच्या डावाला आवर घातला. 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात थोडीशी डळमळीत झाली. सलामीवीर संजू सॅमसन 11 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर उर्विल पटेलने वेगवान 24 धावांची खेळी करत संघाला गती दिली. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. दोघांनी संयमी आणि अचूक फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. गायकवाडने पाच चौकार आणि दोन षटकारांसह 48 चेंडूंमध्ये नाबाद 67 धावा केल्या, तर कार्तिक शर्माने 40 चेंडूंमध्ये नाबाद 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. या दोघांच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईने 18.1 षटकांत दोन गडी गमावत लक्ष्य सहज गाठले आणि सामना आपल्या नावावर केला. मुंबईकडून गोलंदाजीत केवळ जसप्रीत बुमराह आणि अल्लाह गझनफर यांनाच प्रत्येकी एक बळी मिळवता आला. इतर गोलंदाजांना अपेक्षित प्रभाव टाकता आला नाही. या पराभवामुळे मुंबईचा नवव्या सामन्यातील सातवा पराभव नोंदवला गेला आहे. उर्वरित सामने जिंकले तरी त्यांना मर्यादित गुणच मिळू शकतात, त्यामुळे पुढील फेरी गाठणे आता त्यांच्या हाताबाहेर गेले आहे.

COMMENTS