नायगाव: तालुक्यातील नरसी येथील कु. तपस्या साईनाथ पुलचवाड हिने अखंड परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि यशाची जिद्द यांच्या बळावर NEET 2026 परीक्षेत ६५

नायगाव: तालुक्यातील नरसी येथील कु. तपस्या साईनाथ पुलचवाड हिने अखंड परिश्रम, नियोजनबद्ध अभ्यास आणि यशाची जिद्द यांच्या बळावर NEET 2026 परीक्षेत ६५५ गुण मिळवत देशात ११२० वा क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे ती देशातील प्रतिष्ठित AIIMS (एम्स) वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरली असून तिच्या यशाने नरसीसह संपूर्ण नायगाव तालुक्याचा मान उंचावला आहे. तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
तपस्या ही जिल्हा परिषदेच्या शिक्षिका अनुपमा बन आणि साईनाथ पुलचवाड यांची कन्या आहे. तिच्या शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, नरसी येथून झाली. लहानपणापासूनच ती अभ्यासात हुशार, जिज्ञासू आणि मेहनती विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. इयत्ता नववीपासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत तिने नांदेड येथे राहून वैद्यकीय प्रवेश परीक्षेची नियोजनबद्ध तयारी सुरू केली. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे काटेकोर नियोजन आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.
तपस्याने शालेय जीवनातही अनेक गुणवत्तापूर्ण यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीत ती जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली होती. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतही तिने यश मिळवले. दहावीच्या (CBSE) परीक्षेत तिने ९६.६० टक्के गुण मिळवले असून गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवत आपल्या असामान्य गुणवत्तेची छाप उमटवली होती. त्यानंतर अकरावी-बारावीच्या शिक्षणासोबत नीट परीक्षेची काटेकोर तयारी करून तिने राष्ट्रीय स्तरावर हे यश मिळवले.
या यशाचे श्रेय आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि स्वतःची चिकाटी यांना असल्याचे तपस्याने सांगितले. “ध्येय स्पष्ट ठेवा, सातत्याने अभ्यास करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा; यश नक्की मिळते,” असा प्रेरणादायी संदेशही तिने विद्यार्थ्यांना दिला.
तपस्याच्या या उज्ज्वल यशाबद्दल शिक्षक, शिक्षणप्रेमी, विविध सामाजिक संस्था, मित्रपरिवार तसेच नरसी व नायगाव तालुक्यातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करत उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तपस्या पुलचवाडची ही यशोगाथा प्रेरणादायी ठरत असून, जिद्द, शिस्त, सातत्य आणि मेहनतीच्या बळावर कोणतेही मोठे ध्येय गाठता येते, हाच संदेश तिच्या यशातून मिळत आहे.

COMMENTS