नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह दिलेल्या भेटीमुळे देशभरात चर

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कुटुंबासह दिलेल्या भेटीमुळे देशभरात चर्चांना उधाण आले आहे. सर्वोच्च घटनात्मक पद भूषविलेल्या व्यक्तीने या श्रद्धास्थानाला दिलेली भेट विशेष ठरत असून, या दौर्याचे छायाचित्रे समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहेत.
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री, जे ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जातात, त्यांच्या दरबार आणि प्रवचनांमुळे आधीपासूनच चर्चेत आहेत. भक्तांच्या अडचणींवर आध्यात्मिक मार्गदर्शन देण्याच्या त्यांच्या दाव्यामुळे मोठ्या संख्येने भाविक येथे दाखल होत असतात. मात्र, त्यांच्या कथित चमत्कारांवरून वेळोवेळी वादही निर्माण झाले असून, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या मुद्द्यांवर समाजात सतत चर्चा रंगत असते. बागेश्वर धामच्या अधिकृत माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी भूषण गवई यांनी पत्नी तेजस्विनी गवई आणि पुत्र ज्योतिरादित्य गवई यांच्यासह धामात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी बागेश्वर बालाजीचे दर्शन घेत पूजाअर्चा केली. दर्शनानंतर गवई यांनी कुटुंबासह धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. या वेळी शास्त्री यांनी त्यांना बालाजी भगवानांचे पवित्र चित्र भेट दिले. सुमारे अर्धा तास दोघांमध्ये आध्यात्मिक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे पुन्हा एकदा बागेश्वर धाम आणि त्याच्या कार्यपद्धतीभोवतीचा वैचारिक वाद केंद्रस्थानी आला असून, श्रद्धा आणि तर्क यामधील संघर्षावर नव्याने चर्चा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

COMMENTS