विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विकासासाठी आम्ही कोणाबरोबरही जाऊ शकतो ; खा. डॉ. विखेंची स्पष्ट भूमिका

आम्ही विकासाबाबत कोणतेही राजकारण करत नाही, त्यामुळे नगर दक्षिणेच्या व नगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन कोणाशीही आघाडी करायला तयार आहोत.

साकरवाडीमध्ये मोफत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन
परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे ‘सर्वोच्च’ निर्देश | DAINIK LOKMNTHAN
अन्नदान सेवेची झाली वर्षपूर्ती

अहमदनगर/प्रतिनिधी- आम्ही विकासाबाबत कोणतेही राजकारण करत नाही, त्यामुळे नगर दक्षिणेच्या व नगर शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही स्तरावर जाऊन कोणाशीही आघाडी करायला तयार आहोत. पण ही आघाडी आमच्या स्वार्थासाठी नाही, जनतेच्या हितासाठी आहे, एवढेच मला सांगायचे आहे, असे वक्तव्य खासदार डॉ. सुजय विखे यांनी रविवारी येथे केले.

महापालिकेच्या माध्यमातून अडीच वर्षांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी येथील माऊली सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर  मालन ढोणे, भाजप माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले आदी यावेळी उपस्थित होते. खासदार विखे म्हणाले की, शहरात अनेक विकास कामे करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्यावर मात करून आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. महापालिकेमध्ये भाजपच्या सत्तेला आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, ही वस्तुस्थिती आहे. या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व त्यांच्या नगरसेवकांची बहुमोल साथ मिळाली व त्यामुळे या काळात नगर शहराची प्रलंबित असलेली अमृत पाणी योजना, भुयारी गटार योजना, नगर शहरातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपुलाचा विषय आम्ही आमच्या कार्यकाळामध्ये मार्गी लावू शकलो, असेही ते म्हणाले. अमृत योजनेचे काम झाल्यामुळे नगर शहराला 24 तास पाणी आता मिळणार आहे, या योजनेचे साधारण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे, लवकरच ही योजना पूर्णत्वाला जाईल असे ते म्हणाले. घनकचराचा विषय नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होता, स्वच्छता रँकिंगमध्ये महापालिका देशात 274 नंबरवर होती. त्यानंतर कचरा कुंडी मुक्त शहर, घंटा गाडी द्वारे कचरा संकलन यामुळे देशात 40 नंबर वर आलो व 3 स्टार मानांकन मिळाले. कचर्‍यातून खत निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे  कचर्‍यातून बायोगॅस प्रकल्पाच्या माध्यमातून वीज निर्मिती करता येते का हे आता पाहिले जाणार आहे, असे ते म्हणाले. नगर शहराचा उड्डाणपुलाचा  प्रश्‍न मार्गी लावला. महापालिकेच्या  माध्यमातून जमीन भूसंपादन करायचे होते. पाच महिन्याच्या कालावधीमध्ये पुलाचे 55 टक्के काम झाले. राज्यामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये काम होणारे हे पहिले काम असेल, असे ते म्हणाले. पुढच्या कामासाठी 17 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी आमदारांनी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून जर हा निधी आणला तर उड्डाणपुलाचे कामलवकर पूर्ण होईल, असे ते म्हणाले. विकास कामांमध्ये राजकीय जोडे बाजूला ठेवून शहर विकासाचे प्रश्‍न मार्गी लावताना आमदार जगताप व माझ्यात विकास कामासाठी नेहमी संपर्क असतो, आम्ही एकत्रितपणे बसून प्रश्‍न सोडवतो, असेही आवर्जून सांगितले. आमदार जगताप म्हणाले की, महापालिकेच्या माध्यमातून नगरसेवकांच्या निधीतून कामे केली जातात. गेल्या काही वर्षांमध्ये नगरच्या राजकारणामध्ये अनेक विकासकामांना खोडा घालण्याचा प्रकार सुद्धा घडलेला आहे. कुठे अतिक्रमण काढू द्यायचे नाही, कुठे रस्तासुद्धा मोकळा करू द्यायचा नाही, यामुळे विकासाचा आलेला निधी अनेक वेळेला परत गेल्याची उदाहरणे आहे.पण आता विकासाचा विषय सुरू झाला असून, भविष्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आलेला निधी विकास कामांना योग्य पद्धतीने वापरला जाईल व ती कामे मार्गी लावली जातील, या दृष्टिकोनातून नगरसेवक व लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील, असेही ते म्हणाले. नगर शहरातील सर्व डिपी रस्त्यांचा काँक्रिटीकरण विकास आराखडा तयार केला असून राज्य सरकारची परवानगी घेऊन केंद्र सरकारकडे निधीसाठी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी, विकासकामांमध्ये राजकारण न आणता शहराचा विकास हाच ध्यास ठेवून आगामी काळामध्ये वाटचाल करावी, असे आवाहन केले. महापौर वाकळे यांनी अडीच वर्षांत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी साथ दिल्याने महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे उभी करता आली असल्याचे आवर्जून सांगितले. अमृत पाणी योजना, एलईडी पथदिवे, स्वच्छता मानांकन, घंटागाड्या, रस्ते अशा कामांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुमारे दोनशेहून अधिक कोटी रुपयांचा निधी आणला गेला व राजकारणापलीकडे जाऊन आम्ही नगर शहराचा विकास हेच उद्दिष्ट घेऊन आम्ही काम केले आहे, असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले, अनिल शिंदे, सुनील रामदासी, मनोज कोतकर, सभागृह नेते रवींद्र बारस्कर, मनोज दुल्लम, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, संभाजी कदम, निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुधे, सचिन जाधव, कुमारसिंह वाकळे, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, गणेश नन्नवरे, अजय चितळे, सतीश शिंदे, संजय ढणे, अजय ढोणे, धनंजय जाधव, अ‍ॅड. विवेक नाईक, गोविंद वाघ, रामदास आंधळे आदी उपस्थित होते. डॉ. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले.

राजकीय टोलेबाजी

महापालिकेतील भाजप सत्तेच्या अडीच वर्षातील विकास कामाचा आढावा घेताना महापौर वाकळे व उपमहापौर मालनताई ढोणे यांचा यशस्वी कारकीर्दीबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजीही रंगली. खा. विखे यांनी यापुढे समाजमाध्यमातून दाढी करताना, ज्येष्ठांशी बोलतानाचे फोटो शेअर करण्याचे सुतोवाच केले. असे फोटो टाकणे हाच विकास काहींना वाटतो, अशी टिपणीही त्यांनी कोणाचेही नाव न घेता केली. तसेच महापौरांना जलक्रांतीचे जनक संबोधल्यावरूनही मिश्किल टिपणी काही वक्त्यांनी केली.

COMMENTS