शेवगाव : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ. नागेश शिवनाथ मानूरकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन के

शेवगाव : येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी डॉ. नागेश शिवनाथ मानूरकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चीनमधील प्रतिष्ठित ‘बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (बीजिंग) या विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र (केमिस्ट्री) विषयातील संशोधनासाठी विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या या यशामुळे शेवगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. नागेश मानूरकर यांनी रसायनशास्त्र विषयात सखोल संशोधन करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करून पुढील संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. नागेश मानूरकर हे शेवगाव तालुक्यातील हादगाव कांबी येथील रहिवासी असून त्यांचा हा प्रवास अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आईने जिद्द, मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर कठीण परिस्थितीतही मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आईचे अथक परिश्रम आणि डॉ. नागेश यांची कठोर चिकाटी यांमुळेच हे आंतरराष्ट्रीय यश मिळवणे शक्य झाले. ग्रामीण भागातून पुढे येत त्यांनी मिळवलेल्या या यशामुळे शेवगावच्या शैक्षणिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

COMMENTS