माजलगाव : माजलगाव तालुक्यातील शुक्ल तीर्थ, लिमगाव येथे दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अत्यंत उत्साहात, अभिम

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील शुक्ल तीर्थ, लिमगाव येथे दि. 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती अत्यंत उत्साहात, अभिमानाने आणि सामाजिक एकात्मतेच्या संदेशासह साजरी करण्यात आली. गावातील नागरिकांनी एकत्र येत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडला.
जयंतीनिमित्त विशेष उपक्रम म्हणून गेल्या तीन ते चार वर्षांपासून दिवस-रात्र न थकता वीज सेवा देणारे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन मुंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. त्यांना स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांच्या उल्लेखनीय सेवाभावाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या तत्पर सेवेमुळे गावातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात सुटल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सचिन उजगरे, गावचे सरपंच कृष्णा थावरे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ पोळ, विवेक पोळ, वैभव वगरे, प्रकाश खडूळ, विष्णू शेरकर, मुंजा पांचाळ, नवनाथ आदमाने, नारायण पांचाळ, ओमप्रकाश गुंगेवाड यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून समाजात शिक्षण, समानता आणि बंधुता यांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच समाजासाठी प्रामाणिकपणे कार्य करणार्या व्यक्तींचा सन्मान करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची पद्धत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. सत्कारामुळे भावूक झालेले गजानन मुंडे यांनी ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानत भविष्यातही तत्परतेने सेवा देत राहण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

COMMENTS