नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या चर्चांना केंद्र आणि महाराष्ट्र र

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा देशव्यापी लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या चर्चांना केंद्र आणि महाराष्ट्र राज्य सरकारने ठामपणे फेटाळले आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता संयम राखावा, असे आवाहन करत सरकारने सध्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्वतंत्रपणे निवेदने देत लॉकडाऊनसंदर्भातील बातम्या निराधार असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी संसदेत पंतप्रधानांनी जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे नमूद केले होते. या विधानाचा चुकीचा अर्थ काढत लॉकडाऊनच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. किरण रिजिजू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लॉकडाऊनच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. घाबरण्याचे कारण नाही. आवश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सरकारने राज्यांना सतर्क केले असून साठेबाजीवर कडक नजर ठेवली जात आहे. हरदीप सिंग पुरी यांनीही अशा अफवा पसरवणे ही जबाबदारीशून्य कृती असल्याचे सांगितले. सरकारच्या पातळीवर लॉकडाऊनचा कोणताही प्रस्ताव नाही. नागरिकांनी शांतता राखून एकजुटीने परिस्थितीला सामोरे जावे, असे त्यांनी नमूद केले. निर्मला सीतारामन यांनी काही राजकीय वक्तव्यांवर टीका करत स्पष्ट केले की, देशात इंधनटंचाई किंवा लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. कोविडसारखा लॉकडाऊन पुन्हा लागू होणार नाही. नागरिकांनी निश्चिंत राहावे, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या विधानाचा संदर्भ देत सरकारला कोविड काळातील अनुभवांची आठवण करून दिली. त्या काळातील परिस्थिती विसरली गेली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही कोविड काळातील अडचणींचा उल्लेख करत भविष्यात अशा संकटांचा सामना करताना सरकारची भूमिका स्पष्ट असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. सध्याच्या जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सर्व राज्यांच्या संपर्कात असून आवश्यक उपाययोजनांबाबत नियमित चर्चा सुरू आहे. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येत आहे.

अफवा पसरवल्यास फौजदारी कारवाई : मुख्यमंत्री फडणवीस
देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन डागणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सएपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ व अशोक खरात प्रकरणातही चौकशी अंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

COMMENTS