Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धाब्यावर!;जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर तरीही तलावातून अवैध पाणी उपसा सुरूच; पाणीटंचाईचे संकट गडद

बीड : पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपश्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकार्‍यांच्या स्पष्ट

तलाव उशाला कोरड घशाला, आठ महिन्यापासून जलजीवन ठप्प
आ. विजयसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश-गोदावरी नदीपात्रात पाणी सुटणार
भुतवडा तलाव पाणीपातळी खालवली; टंचाई काळात नागरिकांनी सहकार्य करावे ; नगराध्यक्षा चिंतामणींचे आवाहन

बीड : पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपश्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकार्‍यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित यंत्रणा निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे.
जिल्हाधिकारी विवेक जान्सन यांनी पिण्याच्या पाण्याचे नियोजन कोलमडू नये यासाठी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधून होणारा नियमबाह्य पाणी उपसा तत्काळ थांबवण्याचे आदेश महसूल व पाटबंधारे विभागाला दिले होते. मात्र, या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, भायाळा तलावावर अवलंबून असलेल्या भायाळा, वाघिरा, मेंगडेवाडी, लिंबागणेश, पोखरी (घाट), पिंपरनई, बेलगाव (सोमनाथवाडी) आदी गावांमध्ये पाणीटंचाईचे सावट गडद होत चालले आहे. शेतातील विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा योजना आणि विंधन विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
कागदी घोडे नाचवण्यात प्रशासन मग्न – डॉ. गणेश ढवळे
अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी नेमण्यात आलेले पथक निष्क्रिय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी केला आहे. प्रशासन केवळ कागदोपत्री कारवाई करत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
तलावातील पाणी साठा संरक्षित ठेवण्याची मागणी
शासनाच्या नियमानुसार तलावातील 67 टक्के पाणीच सिंचनासाठी वापरण्याची परवानगी असून उर्वरित 33 टक्के पाणी मानव, जनावरे व वन्यजीवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे उल्लंघन होत असल्याने भविष्यात गंभीर पाणीबाणी निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. डॉ. ढवळे यांनी तलावातील पाणीसाठा संरक्षित ठेवावा तसेच कामचुकार अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
जिल्ह्यात पाणीसाठा झपाट्याने घटतोय
वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून जिल्ह्यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील 16 मध्यम प्रकल्पांपैकी 3 प्रकल्पांमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी शिल्लक आहे. तसेच 126 लघु प्रकल्पांपैकी 12 प्रकल्प जोत्याखाली गेले असून 21 प्रकल्पांमध्ये 50 टक्केच पाणी आहे. शासनाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 143 धरणांमध्ये सध्या 198.712 दशलक्ष घनमीटर पाणी मृतसाठ्यात आहे, तर 30 धरणांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
दुष्काळाची शक्यता वाढली
बीड जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. यावर्षी अल निनो च्या प्रभावामुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना न केल्यास ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS