Homeताज्या बातम्या

नांदेड उत्तरमध्ये दर्जेदार शिक्षणासाठी डिजिटल शाळांचा संकल्प; रंगभरण स्पर्धेला 3,500 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादसंध्याताई फाऊंडेशनच्या उपक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा व मुख्याध्यापकांचा गौरव

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टप्प्याटप्प्याने डिजिटल करण

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात गुणवंतांचा  गौरव
आष्टी-पाटोदा-शिरूरमधील शाळा बनणार रोल मॉडेल; ‘आमदार श्री शाळा’ उपक्रमाची घोषणामिशन निपुण बीडमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प
विड्यात परम सेवा फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्याचे मोफत वाटपसंतांच्या विचारांचा वारसा आणि आधुनिक शिक्षणाची जोड गरजेची – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज शास्त्री विडेकर



नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्यात येणार असून, इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या धर्तीवर आधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी दिली.
संध्याताई फाऊंडेशन, महाराष्ट्रच्या वतीने जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित रंगभरण स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. नियोजन भवन येथे शनिवारी (19 जुलै) मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार श्रीजया चव्हाण, महापौर कविता मुळे, संध्याताई फाऊंडेशनच्या अध्यक्षा संध्याताई कल्याणकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, मनपा शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे, नगरसेवक सुहास कल्याणकर, महिला जिल्हाप्रमुख अपर्णा नेरलकर, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार कल्याणकर म्हणाले की, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक पालकांना महागड्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांची फी परवडत नाही. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल शाळा उभारण्यावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांनी डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी बनून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात संध्याताई कल्याणकर यांनी सांगितले की, या रंगभरण स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या 50 शाळांमधील सुमारे 3 हजार 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांत एकूण 250 विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच विशेष कार्य करणार्‍या 50 मुख्याध्यापकांचा गौरव करण्यात आला. मोबाईलच्या वाढत्या वापरापासून मुलांना दूर ठेवून त्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार श्रीजया चव्हाण यांनी या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. महापौर कविता मुळे यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम असल्याचे नमूद केले. अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी पालकांनी मुलांवर अनावश्यक शैक्षणिक दडपण टाकू नये, तर त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळांमधूनही दर्जेदार शिक्षण मिळत असून, मोबाईलच्या युगात मुलांच्या हातात ब्रश देण्याचे काम संध्याताई कल्याणकर यांनी केले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना मिळते, असे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. मनपा शिक्षणाधिकारी प्रविणा मांदळे यांनीही या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी कलाशिक्षक राजाराम सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश कासेटवार यांनी केले. मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उपस्थितीत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
संध्याताई कल्याणकर यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक
संध्याताई कल्याणकर यांनी यापूर्वीही विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण स्पर्धेमुळे हजारो विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणार्‍या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
————-
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मागणीला यश
पुढील डीपीडीसी बैठकीत पत्रकारांना प्रवेश देण्याचे पालकमंत्री अतुल सावे  यांचे आश्वासन
नांदेड । प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) बैठकीत मान्यताप्राप्त पत्रकारांना प्रवेश देण्याची आणि बैठकीचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्याची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची मागणी अखेर यशस्वी ठरली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री अतुल सावे यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी पालकमंत्री सावे यांनी पुढील डीपीडीसी बैठकीपासून पत्रकारांना प्रवेश देण्याचे आश्वासन दिले.
पत्रकारांनी दिलेल्या निवेदनात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहण्यासाठी पत्रकारांची उपस्थिती आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. विकासकामांचे नियोजन, निधीचे वाटप आणि प्राधान्यक्रम निश्चितीची माहिती नागरिकांपर्यंत विश्वासार्हरीत्या पोहोचण्यासाठी पत्रकारांना बैठकीत प्रवेश मिळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, लोकसभा आणि विधानसभेच्या कामकाजाप्रमाणे डीपीडीसी बैठकीचे थेट प्रक्षेपण जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवर करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना विकासकामांबाबतची माहिती थेट पाहता येईल आणि प्रशासनाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल, असे पत्रकारांनी निवेदनात नमूद केले. पत्रकारांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री अतुल सावे यांनी पुढील डीपीडीसी बैठकीत मान्यताप्राप्त पत्रकारांना प्रवेश देण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच पत्रकारांनी मांडलेल्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजात अधिक पारदर्शकता निर्माण होण्यास तसेच विकासकामांची अचूक माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी भावना पत्रकारांनी व्यक्त केली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मराठवाडा अध्यक्ष प्रवीण खंदारे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभय कुळजगाईकर, विजय निलंगेकर, राजकुमार कोटलवार, कुवरचंद मंडले, प्रमोद चौधरी, संघटनेचे जिल्हा सचिव प्रवीणकुमार देशमुख, यशपाल भोसले, गजानन देशमुख, अर्जुन राठोड, संघरत्न पवार, नकुल जैन, शिवाजी हंबर्डे, पवन जगडमवार, भैय्यासाहेब गोडबोले, मनोज मनपुरे, मदनपाल बनसोडे, श्रीराम मोटरगे, धनंजय कुलकर्णी, शेख रफिक, किरण कांबळे, अशोक झलारे, अविनाश परघणे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

COMMENTS