पाथर्डी : आषाढ अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीने दीपपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला

पाथर्डी : आषाढ अमावस्येनिमित्त श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पारंपरिक पद्धतीने दीपपूजन सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अर्थात अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश देणाऱ्या या दीपपूजनाने संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
पवित्र श्रावण महिन्याच्या स्वागतासाठी तसेच जगदंबा माता मोहटादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांच्या हस्ते श्री मोहटादेवीची विधिवत महापूजा करण्यात आली.
मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पारंपरिक समया, चांदीचे आणि पितळी निरांजन प्रज्वलित करण्यात आले होते. दिव्यांच्या लख्ख प्रकाशाने गाभारा उजळून निघाल्याने मंदिरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य भूषणदेव साकरे, भास्कर देशपांडे आणि विकास क्षीरसागर यांनी केले.
यावेळी जनसंपर्क अधिकारी भीमराव खाडे, लेखापाल संदीप घुले, देवस्थानचे कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीप अमावस्येनिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, दिव्यांच्या प्रकाशामुळे संपूर्ण गडावर सकारात्मक ऊर्जा आणि चैतन्य निर्माण झाल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली. मोहटादेवी गडाकडे येणाऱ्या घाटरस्त्याची कामे पूर्ण झाली असून, सध्या मंदिर परिसरासह डोंगररांग हिरव्यागार वनश्रीने नटली आहे. त्यामुळे निसर्गरम्य वातावरणात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री मोहटादेवी गड आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने महाप्रसाद, पिण्याचे पाणी, पार्किंग आणि सुरळीत दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती.

COMMENTS