रायगड: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पावन निमित्ताने किल्ले रायगडावर पार पडलेल्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे य


रायगड: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या पावन निमित्ताने किल्ले रायगडावर पार पडलेल्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे अधिपती नव्हते, तर त्यांनी रयतेच्या मनावर आणि हृदयावर कायमस्वरूपी अधिराज्य गाजवले, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
रायगड हा फक्त ऐतिहासिक वास्तू नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि अस्मितेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचे शिंदे म्हणाले. तिथीनुसार ३५३ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याच्या स्वप्नाला वैभवशाली वास्तवाचे रूप प्राप्त झाले. त्या ऐतिहासिक क्षणाची प्रेरणा आजही प्रत्येक मराठी माणसाला नवी ऊर्जा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या भाषणाच्या प्रारंभी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत त्यांनी शिवरायांना कोटी-कोटी वंदन केले.
शिवराज्याभिषेक सोहळा तिथीनुसार साजरा करण्याची परंपरा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली होती. पुढे शिवभक्तांच्या सक्रिय सहभागामुळे या सोहळ्याला व्यापक लोकमान्यता मिळाली आणि शासनाने त्याला अधिकृत स्वरूप प्रदान केले. त्यामुळे हा उत्सव आता केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम न राहता महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा महोत्सव बनला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिवरायांनी स्वराज्य उभारताना प्रजेच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले. न्याय, शौर्य, संयम, दूरदृष्टी, शिस्त, प्रशासकीय कौशल्य आणि गनिमी कावा याचा आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांचे संरक्षण, सर्वधर्मसमभाव आणि लोकाभिमुख शासन ही त्यांच्या राज्यकारभाराची प्रमुख वैशिष्ट्ये होती. राज्य शासनदेखील लोककल्याणच्या त्याच तत्त्वांवर काम करत असल्याचे सांगताना त्यांनी, महिलांच्या सन्मानासाठी आणि आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा विशेष उल्लेख केला.
रायगडावर उपस्थित असलेल्या हजारो शिवभक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडला. नव्या पिढीने शिवचरित्राचा अभ्यास करून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.

COMMENTS