आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी 21 गाळ्यांवर केलेल्या तोडक कारवाईमुळे शहरात संतापाची लाट उसळ

आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांनी 21 गाळ्यांवर केलेल्या तोडक कारवाईमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित गाळेधारकांकडे मालकी हक्काची कागदपत्रे असतानाही त्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता थेट पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, संबंधित गाळे अतिक्रमण असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी कायद्यानुसार संबंधितांना नोटीस देणे,त्यांची बाजू ऐकून घेणे आणि त्यानंतरच कारवाई करणे बंधनकारक असताना हा नियम पायदळी तुडवण्यात आल्याचा आरोप होत आहे. जिल्हाधिकार्यांनी स्वतःमोजणी करा, संबंधितांना संधी द्याअसे निर्देश दिल्याचे सांगितले जात असताना देखील त्या आदेशाला फाट्यावर मारत कारवाई करण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गाळेधारकांचे म्हणणे आहे की, विकासकामासाठी जागा आवश्यक असेल तर शासनाकडे त्यासाठी स्पष्ट नियम आहेत. मालकी हक्काची जागा असल्यास योग्य मोबदला देऊन जमीन संपादित करणे आवश्यक असते.मात्र कोणतीही प्रक्रिया न राबवता थेट बुलडोझर चालवण्यात आल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पाडण्यात आलेल्या 21 गाळ्यांपैकी सुमारे 10 गाळ्यांवर न्यायालयाचा मनाई हुकूम असल्याचेही बोलले जात आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना देखील कारवाई करण्यात आल्याने कायद्यापेक्षा अधिकारी मोठे झाले आहेत का?असा सवाल आता उपस्थित होत आहे.स्थानिक नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की, प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ हे अभियंता म्हणून कमी आणि राजकीय कार्यकर्ते म्हणून अधिक वागत असल्यानेच अशा मनमानी कारवाया वाढीस लागल्या आहेत. प्रशासनाने सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात व्यापक आंदोलन उभे राहील, असा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे. आज सर्वसामान्य माणूस न्याय मागतोय आणि त्यालाच प्रशासनाच्या दडपशाहीला सामोरे जावे लागत असेल, तर हा लोकशाहीसाठी अत्यंत गंभीर विषय आहे. अन्याय करणार्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
सरकार सामान्य जनतेसाठी की धनाढ्यांच्या हितासाठी?
आष्टीतील 21 गाळे पाडण्याच्या कारवाईनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.नेमकं सरकार कोणाच्या हातातील बाहुलं झालं आहे? कोणाच्या सांगण्यावरून अशा प्रकारची मनमानी केली जात आहे? सामान्य नागरिक न्याय मागत असताना त्यालाच दडपशाहीला सामोरं जावं लागत असेल, तर लोकशाही धोक्यात आली आहे,अशा तीव्र प्रतिक्रिया शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केली आहे.
आष्टी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्याशी सम्पर्क साधला असता आष्टी ते पिंपरी या रस्ता रुंदीकरणा साठी अतिक्रमणामुळे अडथळा निर्माण होत होता त्यामुळे संबंधित अतिक्रमित गाळा धारकांना दोन दिवस अलाऊन्स मेट करून सूचना दिल्या होत्या तसेच दोन दिवस अवधी दिल्यामुळे त्यांनी आपापल्या सामान काढून घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान झाले नाही..

COMMENTS