कर्जत : तालुक्यातील दुरगाव तलावात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या पाण्याचा उपसा होत असल्याचा गं

कर्जत : तालुक्यातील दुरगाव तलावात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररीत्या पाण्याचा उपसा होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. तलावातून दररोज हजारो लिटर पाणी उपसले जात असून संबंधित यंत्रणांकडून कारवाई होत नसल्याने आगामी काळात परिसरातील गावांसह टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या भागांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या साठ्यावरच डल्ला मारला जात असल्याचा आरोप होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कुकडी प्रकल्पातून नुकतेच दुरगाव तलावात पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. महसूल प्रशासनाने हा साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला असून काही गावांच्या शासकीय टँकरसाठीही याच तलावातील पाण्याचा वापर केला जात आहे. मात्र, तलावातून मोठ्या प्रमाणावर अनधिकृतरीत्या पाणी उपसले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तलावात थेट वीजपंप सोडून दररोज हजारो लिटर पाण्याचा उपसा केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. याशिवाय होजपाईपच्या माध्यमातूनही पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य शशिकांत निंबाळकर, रवींद्र जगताप आणि संदीप सुपेकर यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे. काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, या प्रकरणातील काही लाभार्थी प्रभावशाली व्यक्ती, बडे बागायतदार तसेच शासकीय सेवेशी संबंधित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासन संबंधितांवर कारवाई करणार का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
कुकडी प्रकल्पाचे पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते. मात्र, त्याच पाण्याचा बेकायदेशीर उपसा होत असल्याचा आरोप होत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात आहे. वेळेत कारवाई न झाल्यास भविष्यात टँकरसाठीही पाणी उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
तलाव परिसरात अनधिकृत वीजजोडण्या?
तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वीजजोडण्या देण्यात आल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. मुख्य वीजवाहिन्यांमधून थेट जोडण्या घेऊन वीजपंप चालविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारात काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचीही चर्चा परिसरात आहे.
प्रांताधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी
आगामी काळात पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रांताधिकारी नितीन पाटील आणि तहसीलदार रवी सत्वन यांनी तातडीने पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

COMMENTS