माहूर : अधिकमासाचे औचित्य साधून शनिवार (दि. ३० मे) रोजी श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरात देवीला विविध प्रकारच्या आंब्यांची आकर्षक

माहूर : अधिकमासाचे औचित्य साधून शनिवार (दि. ३० मे) रोजी श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरात देवीला विविध प्रकारच्या आंब्यांची आकर्षक व मनमोहक आरास करण्यात आली. या विशेष आरासेमुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
अधिकमासानिमित्त करण्यात आलेली आंब्यांची ही आरास भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. विविध जातींच्या आणि रंगछटांच्या आंब्यांनी सजविण्यात आलेल्या या देखाव्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. ही आकर्षक आरास मंदिराचे मुख्य पुजारी शुभम भोपी यांच्या हस्ते करण्यात आली.
दिवसभर मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांनी रेणुकामातेच्या चरणी नतमस्तक होत कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. अधिकमासाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक ती व्यवस्था केली आहे. धार्मिक कार्यक्रम, भजन-कीर्तन आणि पूजाविधींमुळे माहूर नगरीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संपूर्ण परिसर ‘जय रेणुका माते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

COMMENTS