नवी दिल्ली/मुंबई : अमेरिका-इस्त्राईल यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर त्याचे परिणाम आत्ता संपूर्ण जगभरात उमटायला लागले आहेत. युद्धाच्या 20

नवी दिल्ली/मुंबई : अमेरिका-इस्त्राईल यांनी इराणविरोधात युद्ध सुरू केल्यानंतर त्याचे परिणाम आत्ता संपूर्ण जगभरात उमटायला लागले आहेत. युद्धाच्या 20 दिवसांनंतर भारतात देखील महागाईचे चटके जाणवायला सुरूवात झाली आहे. शुक्रवारी प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2 रूपयांची वाढ झाल्यानंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने औद्योगिक डिझलची किंमत वाढवली आहे. या डिझेलची किंमत 87.67 रुपयांहून थेट 109.59 प्रति लिटरवर पोहचली आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर 21.92 रुपयांनी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम उद्योग विश्व, वाहतूक आणि वीज उत्पादनावर होणार आहे. इंधनाच्या दरानंतर सर्वसामान्यांच्या जगण्यातील वडापाव देखील पाच रूपयांनी अनेक ठिकाणी वाढल्यामुळे त्याची किंमत अनेक ठिकाणी 25-30 रूपयांच्या घरात पोहोचली आहे.
युद्धामुळे व्यावसायिक गॅस मिळणे मुश्किल झाल्यामुळे बाहेरगावी राहून नोकरी करणार्यांवर मोठे गंडांतर येतांना दिसून येत आहे. मेस, हॉटेल्सयांना गॅस मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्यामुळे अनेक कामगारांनी आपल्या मूळगावी जाणे पसंद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सूरत, राजस्थानमधील अनेक कामगार आपल्या मूळ गावी परततांना दिसून येत आहे. तर पुढील आणखी काही दिवस युद्ध सुरूच राहिल्यास एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जगण्यावर देखील होऊ शकतो, परिणामी अनेकांच्या नोकर्यांवर देखील गंडांतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावाचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सरकारी तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सुमारे दोन रुपयांपेक्षा अधिक वाढ केली आहे. मात्र, सामान्य पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या स्थिर ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
प्रीमियम श्रेणीतील पेट्रोल-जे उच्च कार्यक्षमतेच्या वाहनांसाठी वापरले जाते-त्याच्या किमतीत तात्काळ वाढ लागू करण्यात आली आहे. ही वाढ विविध राज्ये आणि शहरांनुसार किंचित बदलू शकते. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये प्रीमियम इंधनाचे दर आता उच्चांकाच्या जवळ पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रीमियम पेट्रोल महागण्यामागे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतार हे प्रमुख कारण आहे. विशेषतः मध्य-पूर्वेतील संघर्षामुळे पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर प्रीमियम इंधनात वापरल्या जाणार्या विशेष घटकांच्या किमतीत वाढ झाल्यानेही दरवाढ अपरिहार्य ठरली आहे. सामान्य पेट्रोलच्या तुलनेत प्रीमियम पेट्रोल आधीच अधिक महाग असते. आता झालेल्या वाढीमुळे हा दरातील फरक आणखी वाढणार आहे. तरीही, बेस इंधनाच्या किमतीत कोणताही बदल न केल्याने व्यापक जनतेवर तातडीचा आर्थिक भार पडलेला नाही. प्रीमियम पेट्रोलचा वापर प्रामुख्याने उच्च दर्जाच्या कार आणि उच्च क्षमतेच्या दुचाकी वाहनांमध्ये केला जातो. त्यामुळे या वर्गातील वाहनधारकांवर या दरवाढीचा थेट परिणाम होणार आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती मंदावल्या
पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने ऊर्जा पायाभूत सुविधांवर आणखी हल्ले करणार नसल्याचे आणि इराणचे तेल वाहून नेणार्या टँकर्सवरील बंदी उठवणार असल्याचे संकेत दिल्याने आज कच्च्या तेलाच्या किमती कमी राहिल्या. ब्रेंट क्रूड आज प्रति बॅरल 110 डॉलरच्या खाली घसरले. त्याचप्रमाणे, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (डब्ल्यूटीआय) क्रूडचा व्यापारही प्रति बॅरल 95 डॉलरच्या खाली होत आहे.

झोमॅटोवरून जेवण मागवणे महागले
प्रीमियम पेट्रोल, वडापावनंतरर आता झोमॅटोवरून जेवण मागवणे देखील महाग झाले आहे. कंपनीने शुक्रवारपासून ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फीमध्ये 19% वाढ केली आहे. युजर्सना प्रत्येक ऑर्डरवर 12.50 ऐवजी आता 14.90 म्हणजेच 2.40 जास्त प्लॅटफॉर्म फी द्यावी लागेल. जीएसटी जोडल्यानंतर ही रक्कम आणखी वाढेल.

COMMENTS