Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने मारले संजय राऊतांच्या फोटोला जोड़े

महाविकास आघाडी मोर्चाचा चुकीचा व्हीडीओ

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांच्या फोटोवर सोमवारी (19 डिसेंबर

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ
इंडियाचे नाव पुसून टाकण्याचा विकृतपणा ः संजय राऊत
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांच्या फोटोवर सोमवारी (19 डिसेंबर) नगरमध्ये जोडे पडले. मुंबईत महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या मोर्चाचा व्हीडीओ सोशल मिडियातून प्रसारित करताना तो मराठा क्रांती मोर्चाचा जुना व्हीडीओ प्रसारित केल्याचा निषेध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी केला. स्टेशन रस्त्यावरील इम्पिरियल चौकात संजय राऊत यांच्या फोटोवर जोड्यांचे प्रहार केले गेले व त्यांचा प्रतीकात्मक पुतळाही पेटवून देऊन त्याचे दहन केले गेले.

राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारमधील काहीजणांनी तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राष्ट्रपुरुष व महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याचा निषेध महाविकास आघाडीने नुकताच मुंबईतील महामोर्चातून केला. मात्र, या मोर्चावर सत्ताधार्‍यांकडून टीका झाली. हा मोर्चा अपेक्षित गर्दीचा नव्हता, महाविकास आघाडीचा हा मोर्चा अपयशी ठरला, शिवसेना जशी नॅनो झाली, तसा त्यांचा हा मोर्चाही नॅनो होता, गर्दी नसल्याने टीव्ही चॅनेल्सला या मोर्चाचे ड्रोन शॉट दाखवता आले नाहीत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मोर्चातील भाषणबाजीवर टीका केली होती. यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते व पत्रकार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला तसेच महाविकास आघाडीच्या मोर्चाचा म्हणून एक व्हीडीओ प्रसारित केला. मात्र, हा व्हीडीओ जुना व मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा सत्ताधार्‍यांकडून केला गेला व त्यावरून प्रवक्ते-पत्रकार राऊत यांचा जोरदार निषेध केला गेला. नगरला जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राऊत यांच्या फोटोवर जोडे मारण्यात आले व त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला गहिरे सरडे व दुतोंडी गांडूळ यांच्या चित्रांची माळ घालून निषेध नोंदवून त्याचे दहन करण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते संजीव भोर यांच्यासह जिल्हाध्यक्ष व मनपा नगरसेवक अनिल शिंदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, महानगर शहर प्रमुख दिलीप सातपुते, अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख सचिन जाधव, संपर्कप्रमुख अमोल पाठक, सोमनाथ माने, लालाभाई शेख, बाबू भोर, गोरख आढाव, अमोल पाठक, शुभम भोंदे, बापू गोरे, सत्यम गुंड, राम झिने, आदिनाथ चदे, गोरख राठोड, संतोष पाचारणे, बंडू इतापे, दीपक शिंदे, अजित भोर, विपुल गोळे, गणेश गोळे, विकास शिंदे, ऋतिक दरेकर आदीसह सहभागी झाले होते.

ही तर नामुष्कीच – या निषेध आंदोलनाच्यावेळी बोलताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊतांनी ज्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडिओचा आधार घेतला, त्या मोर्चांनाच 25 सप्टेंबर 2016 रोजी दैनिक सामनामधून मुका मोर्चा म्हणून त्यांनीच हिणवले होते. ज्या मोर्चांना मुका मोर्चा म्हणून हिणवले, त्याच मोर्चांंचा आधार गर्दी दाखवण्यासाठी घेण्याची वेळ संजय राऊत आणि उद्धव सेनेवर यावी, यापेक्षा मोठी नामुष्की नाही, असे स्पष्ट करून पुढे म्हटले की, उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत हे रोज काही ना काही वादग्रस्त भूमिका घेत अकलेचे तारे तोडत आहेत. महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चा पूर्णतः अपयशी ठरला. तीनही पक्षांनी मिळून एकत्रित आंदोलन पुकारूनही मुंबईतील या मोर्चाला अपेक्षित गर्दी जमवता आली नाही. मुंबई आमचीच.. अशा वल्गना करणार्‍या उद्धव सेनेला ही मोठी चपराक व जिव्हारी लागणारी गोष्ट आहे. या वैफल्यातूनच दि.18 डिसेंबर रोजी संजय राऊत यांनी मुंबईतील हल्लाबोल मोर्चाचे नसलेले विराट स्वरूप दाखवण्यासाठी प्रचंड गर्दी असलेल्या मोर्चाचा एक व्हिडिओ प्रसारित केला. मात्र, वस्तुस्थिती अशी होती की, हा व्हिडिओ 2017 साली मुंबईत निघालेल्या अतिभव्य, ऐतिहासिक व अभूतपूर्व मराठा क्रांती मोर्चाचा हा व्हिडिओ होता. मराठा समाजाने आपल्या न्याय हक्कांसाठी अतिशय शिस्तबद्ध रितीने मुंबईत काढलेला हा मोर्चा न भूतो न भविष्यती.. असा ठरला होता. पण, महाविकास आघाडीच्या हल्लाबोल मोर्चातही अशीच गर्दी झाल्याचा दिखावा करण्यासाठी संजय राऊतांनी चक्क ज्या मराठा क्रांती मोर्चाच्या व्हिडिओचा आधार घेतला, त्या मोर्चांना दैनिक सामनामधून मुका मोर्चा म्हणून हिणवले होते. ज्या मोर्चांना मुका मोर्चा म्हणून हिणवले त्याच मोर्चांचा आधार घेण्याची वेळ संजय राऊत आणि उद्धव सेनेवर यावी यापेक्षा मोठी नामुष्की नाही, असा दावा यावेळी करण्यात आला.

जखमेवर मीठ चोळले… दुसर्‍या बाजूने अशा पद्धतीने मराठा क्रांती मूक मोर्चाचा व्हिडिओ प्रसारित करून संजय राऊत यांनी अखंड मराठा समाजास व मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या विविध जातीसमूहांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे व त्यामुळे उद्भव सेनेच्या संजय राऊत यांच्या लफंगेगिरीचा जाहीर निषेध करतो, असे स्पष्ट करून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी म्हणाले, संजय राऊत यांच्या या कृतीतून उद्धव सेनेची आता पूर्वीप्रमाणे रस्त्यावर उतरून ताकद दाखवण्याची क्षमता राहिलेली नाही, हेही सिद्ध झाले आहे. संजय राऊत ही व्यक्ती दररोज सरड्याप्रमाणे रंग बदलताना तर कधी गांडुळासारखा दुतोंडीपणा करताना पाहायला मिळते. मराठा क्रांती मोर्चाप्रमाणेच संजय राऊतने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे वक्तव्य करून घटनाकारांच्या जन्मस्थळाबाबत संभ्रम निर्माण करून भावना दुखावल्या आहेत. हेच संजय राऊत महामानवांचा अवमान झाला म्हणून एकीकडे बोंब ठोकतात तर दुसरीकडे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचंड बदनामी असलेल्या हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या जेम्स लेनच्या पुस्तकाचे 7 सप्टेंबर 2003 रोजी दैनिक सामनामधून कौतुक छापून आणतात. हा तर दूतोंडीपणाचा कळस झाला. महामानवांच्या अवमानाबद्दल आवाज उठवायचे नाटक करायचे तर दुसरीकडे त्याच महामानवांच्या बदनामीचे कौतुक करायचे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ते छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे मागायचे, अशी दुटप्पी व रंग बदलणारी असंख्य उदाहरणे संजय राऊतांच्या वागण्यातून आपल्याला रोज पाहायला मिळत आहेत, असा दावाही यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला.

राऊत-अंधारेंवर टीका – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोयरसुतक नसल्याप्रमाणे संजय राऊत आणि उद्धव सेनेचे कारनामे सध्या पाहायला मिळत आहेत. हिंदू देव-देवतांबद्दल व वारकरी संप्रदायाबद्दल अतिशय हिणकस व आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या सुषमा अंधारेला पाठीशी घालून मिरवायचे कामही हे लोक करीत आहेत. संजय राऊत व उद्धव सेनेच्या या नौटंकीबाज, नाटकी धोरणाचा अहमदनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS