Homeताज्या बातम्या

जनगणनेच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह?नागरिकांकडून माहिती लपविण्याचे प्रकार, प्रगणकांवर दबाव असल्याची चर्चा

देवळाली प्रवरा : सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेदरम्यान काही नागरिकांकडून वस्तुस्थिती लपवून चुकीची माहिती दिली जात असल्याचे प्रकार समोर येत

देवळाली प्रवरा येथे जनगणना प्रशिक्षण कार्यक्रमअप्पर जिल्हाधिकारी कोळेकर यांचे मार्गदर्शन ; पारदर्शी काम करण्याच्या सूचना
देवळाली प्रवरा नगरपरिषदेत जनगणना प्रशिक्षण उत्साहात
चोरट्यांच्या बंदोबस्तासाठी नागरिकच ‘गस्ती’वर ‘अलर्ट सिस्टीम’मुळे सुरक्षा वाढली;प्रवरा पट्ट्यात चोरट्यांचा धुमाकूळ


देवळाली प्रवरा : सध्या सुरू असलेल्या जनगणना प्रक्रियेदरम्यान काही नागरिकांकडून वस्तुस्थिती लपवून चुकीची माहिती दिली जात असल्याचे प्रकार समोर येत असून, त्यामुळे जनगणनेच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहने, पक्की घरे आणि इतर मालमत्ता असूनही ती नसल्याचे सांगितले जात असल्याची चर्चा विविध भागांत सुरू आहे.
जनगणना ही शासनाच्या विकासनियोजनाचा महत्त्वाचा आधार मानली जाते. लोकसंख्या, शिक्षण, निवास, उत्पन्नाची साधने, मूलभूत सुविधा आणि सामाजिक परिस्थिती यांचा आढावा घेऊन भविष्यातील योजना आखल्या जातात. मात्र नागरिकांकडून चुकीची माहिती दिली गेल्यास या योजनांची दिशा आणि लाभार्थी निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, स्वच्छ भारत अभियानांतर्गत अनेक गावे हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी आजही नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे चित्र असल्याचा आरोप होत आहे. काही गावांमध्ये स्वच्छतागृहांची उभारणी झाली असली तरी त्यांचा नियमित वापर होत नसल्याची चर्चा आहे.
याच पार्श्वभूमीवर जनगणना सर्वेक्षणादरम्यान स्वच्छतागृह वापराबाबत वास्तव नोंदविण्याऐवजी “स्वच्छतागृहाचा वापर केला जातो” अशी नोंद करण्याबाबत काही ठिकाणी प्रगणकांना मौखिक सूचना दिल्या जात असल्याचा आरोप समोर येत आहे. अशा प्रकारच्या सूचनांमुळे पूर्वी हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या गावांतील वास्तव परिस्थिती उघड होण्याची भीती काही अधिकाऱ्यांना असल्याची चर्चा स्थानिक स्तरावर रंगली आहे.
प्रगणकांनी घरभेटी देताना अनेक नागरिक महत्त्वाची माहिती लपवत असल्याचीही माहिती मिळत आहे. वाहनांची संख्या, घराचा प्रकार, उपलब्ध सुविधा आणि मालमत्तेबाबत अपूर्ण अथवा चुकीची माहिती दिली जात असल्याने प्रत्यक्ष परिस्थिती आणि नोंदविलेली माहिती यामध्ये तफावत निर्माण होत आहे.
 तज्ज्ञांच्या मते, जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रामाणिकपणे माहिती देणे आणि प्रगणकांनी कोणत्याही दबावाशिवाय वस्तुनिष्ठ नोंदी करणे आवश्यक आहे. अन्यथा शासनाच्या योजना, निधी वाटप आणि विकासकामांच्या प्राधान्यक्रमांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
 जनगणना प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी वरिष्ठ प्रशासनाने अशा तक्रारींची दखल घेऊन वस्तुस्थितीची पडताळणी करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.

 जनगणात लपविण्यात आलेले ठळक मुद्दे
■ जनगणनेत नागरिकांकडून मालमत्ता व सुविधांची माहिती लपविल्याची चर्चा.
■ दुचाकी, चारचाकी आणि पक्क्या घरांबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचे आरोप.
■ हागणदारीमुक्त गावांच्या दाव्यांवर पुन्हा प्रश्नचिन्ह.
■ काही ठिकाणी स्वच्छतागृह वापराबाबत वास्तवाऐवजी वेगळी नोंद करण्यासाठी दबाव असल्याची चर्चा.

COMMENTS