मुंबई : भिवंडी शहरातील एका चार मजली निवासी इमारतीचा मोठा भाग गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा

मुंबई : भिवंडी शहरातील एका चार मजली निवासी इमारतीचा मोठा भाग गुरुवारी मध्यरात्रीनंतर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. अद्याप चार ते पाच जण ढिगार्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी रात्रभर प्रयत्न सुरू ठेवण्यात आले.
दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने बचावकार्यात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले. प्रवेश मिळावा यासाठी जवळील एका चाळीचा काही भाग यंत्राच्या साहाय्याने हटविण्यात आला. त्यानंतर बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटविण्याचे काम वेगाने सुरू करता आले. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या प्रकरणात तातडीने गुन्हा नोंदवून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. दुर्घटनेनंतर शेजारील इमारतीलाही धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने ती तातडीने रिकामी करण्यात आली. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल, असेही महाजन यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या दुर्घटनेबाबत सरकारवर टीका केली. ही घटना केवळ अपघात नसून निष्काळजीपणा आणि भ्रष्ट व्यवस्थेचे द्योतक असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सामान आणण्यासाठी गेले आणि घात झाला
दुर्घटनाग्रस्त इमारत सुमारे तेरा वर्षांपूर्वी उभारण्यात आली होती. बांधकामातील त्रुटींमुळे महापालिकेने तिला यापूर्वीच धोकादायक घोषित केले होते. गुरुवारी तळमजल्यावरील एका खांबाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना इमारतीला तडे जाऊ लागले. सायंकाळी इमारत एका बाजूला झुकत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रशासनाने तत्काळ इमारत रिकामी करून वीज व पाणीपुरवठा बंद केला. मात्र काही रहिवासी घरातील सामान बाहेर काढण्यासाठी पुन्हा इमारतीत शिरले. त्याचवेळी रात्री साडेअकराच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग कोसळला आणि अनेक जण ढिगार्याखाली अडकले. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम अद्याप सुरू आहे.
मंत्री महाजन यांनी घेतला घटनास्थळाचा आढावा
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, संबंधित इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती आणि तेथील सुमारे तीस कुटुंबांना यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. मात्र काही रहिवासी घरातील साहित्य काढण्यासाठी पुन्हा इमारतीत गेल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

COMMENTS