बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा सेवक तथा माजी प्राचार्य विष्णुपंत रसाळ सर (मांजरसुंबा, ता. जि. बीड) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गवारी येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.
३० जुलै २०२६ रोजी आयोजित या कार्यक्रमात इयत्ता १ ली ते ४ थीच्या वर्गातील १६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्यात शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च, हार-तुरे आणि सत्कार टाळून थेट समाजोपयोगी उपक्रम राबवत विष्णुपंत रसाळ यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीला प्राधान्य दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गवारी येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख मुख्तार, प्रभाळे मॅडम, जाधवर मॅडम यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

COMMENTS