देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात शेतकरी दादासाहेब नाना कोळपे यांच्या शेतातील सुमारे १०० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील वांजुळपोई शिवारात शेतकरी दादासाहेब नाना कोळपे यांच्या शेतातील सुमारे १०० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दादासाहेब कोळपे यांनी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास विहिरीत बिबट्या पडल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेच नसल्याचा गंभीर आरोप कोळपे यांनी केला आहे.
संबंधित विहीर सुमारे १०० फूट खोल असून त्यामध्ये जवळपास ५० फूट पाणी आहे. अशा अत्यंत बिकट परिस्थितीतही बिबट्याने विहिरीतील पाईपचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात फिरत असताना तो अनवधानाने विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
वांजुळपोई परिसरात यापूर्वीही बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले असून मेंढ्या व शेळ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या नुकसानीबाबत वारंवार तक्रारी करूनही वनविभागाकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे वनविभागाच्या या ढिम्म कारभाराविरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या परिसरात सुमारे पाच ते सहा बिबट्यांचा मुक्त वावर असल्याचा दावा स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. नदीकाठ व ऊसाच्या शेतात बिबट्यांचे कायमचे वास्तव्य असल्याने महिला शेतमजूर शेतात कामाला जाण्यास धजावत नाहीत. तसेच रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारे ठरत आहे. या परिसरातील बिबट्यांचा तातडीने पिंजरा लावून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी वनविभागाकडे पुन्हा एकदा केली आहे.

COMMENTS