अकोले: तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमलवाडी येथे घरे, शेती आणि कृषी पायाभूत सुविधांचे

अकोले: तालुक्यातील हरिश्चंद्रगड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमलवाडी येथे घरे, शेती आणि कृषी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे महसूल प्रशासनाकडून करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.
२३ ते २६ जुलैदरम्यान कोहने, कोथळा आणि सोमलवाडी परिसरात अतिवृष्टी झाली. या काळात झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे सोमलवाडी येथील अमोल पांडुरंग सारोक्ते यांच्या राहत्या घरावरील तसेच पोल्ट्री शेडवरील सिमेंट पत्र्यांचे छप्पर उडून गेले. या घटनेत घर व पोल्ट्री शेडचे सुमारे ७५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
तसेच २६ जुलै रोजी शेतकरी पांडुरंग धोंडीबा सारोक्ते यांच्या शेतातील विहिरीवरील संपूर्ण सौर ऊर्जा यंत्रणा वादळी वाऱ्यामुळे उडून गेली. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
महसूल विभागातील तलाठी, ग्रामसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचे पंचनामे केले असून त्याचा अहवाल तहसीलदारांकडे सादर करण्यात आला आहे.
हरिश्चंद्रगड परिसरात यंदाच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेती व मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. आता शासनाकडून किती आणि कधीपर्यंत नुकसानभरपाई मिळते याकडे नुकसानग्रस्तांचे डोळे लागले आहेत.

COMMENTS