नवी दिल्ली: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या विरोधात इंटरनेटवर प्रसारित करण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्याचे निर्देश दिल्ली
नवी दिल्ली: माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांच्या विरोधात इंटरनेटवर प्रसारित करण्यात आलेला आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील संबंधितांना त्यांच्या सोशल मीडिया खात्यांद्वारे नोटीस बजावण्याचे आदेश देत प्रकरणाची पुढील सुनावणी निश्चित केली आहे.
न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना सांगितले की, सोशल मीडिया संकेतस्थळांनी कोणता मजकूर स्वतःहून आक्षेपार्ह आहे की नाही, याचा निर्णय घेण्याची अपेक्षा करता येत नाही. अशा प्रकरणांमध्ये वस्तुस्थितीची पडताळणी करून आवश्यक ते कायदेशीर आदेश देण्याचा अधिकार न्यायालयालाच आहे.
युवराज सिंग यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना सांगण्यात आले की, आक्षेपार्ह स्वरूपाच्या दोन लिंक आधीच हटवण्यात आल्या आहेत. मात्र, उर्वरित लिंकवर त्यांच्या नावाचा आणि प्रतिमेचा परवानगीशिवाय व्यावसायिक लाभासाठी वापर केला जात असून त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे (Personality Rights) उल्लंघन होत आहे. त्यामुळे संबंधित मजकूर तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात न्यायालयाने संबंधितांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले असून, व्यक्तिमत्त्व हक्कांच्या संरक्षण्याच्या दृष्टीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असल्याचे स्पष्ट केले.
अनेक दिग्गजांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे न्यायालयाने केले आहे संरक्षण
यापूर्वीही दिल्ली उच्च न्यायालयाने अनेक नामवंत व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करणारे महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. यामध्ये क्रिकेटपटू अभिषेक शर्मा, गौतम गंभीर आणि सुनील गावस्कर; अभिनेते सलमान खान, अजय देवगण, अल्लू अर्जुन, अर्जुन कपूर, मोहनलाल, विवेक ओबेरॉय, नागार्जुन; अभिनेत्री काजोल, सोनाक्षी सिन्हा, ऐश्वर्या राय, जया बच्चन, तसेच अभिषेक बच्चन; दिग्दर्शक करण जोहर, खासदार रवी किशन, शशी थरूर, पवन कल्याण; योगगुरू बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण, कथाकार अनिरुद्धाचार्य, आध्यात्मिक मार्गदर्शक श्री श्री रविशंकर आणि पत्रकार सुधीर चौधरी यांचा समावेश आहे.

COMMENTS