गर्भावस्थेत मातेचे आणि जन्माला येणार्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासण्या, योग्य आहार आणि आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे

गर्भावस्थेत मातेचे आणि जन्माला येणार्या बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित वैद्यकीय तपासण्या, योग्य आहार आणि आवश्यक काळजी घेणे महत्त्वाचे आहे. सोनोग्राफी तसेच रक्त व लघवीच्या तपासण्या वेळेत केल्यास गर्भाची वाढ आणि आरोग्याची स्थिती समजण्यास मदत होते. त्यामुळे संभाव्य आरोग्यविषयक अडचणींचे वेळीच निदान करून आवश्यक उपचार करणे शक्य होते, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी नागेश चव्हाण यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ बीड आणि जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.28) सकाळी 10.30 वाजता जिल्हा रुग्णालयात ‘गर्भसंस्कार कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी नागेश चव्हाण, वैद्यकीय मार्गदर्शक डॉ. अनुपम जेथलिया, गर्भसंस्कार मार्गदर्शक डॉ. रासेश्वरी कदम, रमा गिरी, फरीदा शेख यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष श्रीगोपाल लड्डा, सचिव सुहास बेदरे, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. सचिन वारे व संकेत कदम तसेच विकास उमापूरकर, सुमित् जैस्वाल,डॉ रमेश घोडके, संदीप खोड,प्रमोद करमाळकर,विवेक बडगे ,प्रा.अभय पटवारी आणि रोटरी अँन्स मधून अनुश्री श्रीगोपाल लड्डा, पूजा सुहास बेदरे,संगीता प्रमोद करमाळकर,सौ.उर्मिला रमेश घोडके हया उपस्थित होत्या. कार्यशाळेत गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांना गर्भावस्थेतील काळजी, योग्य आहार व पोषण, वैद्यकीय तपासण्या, मानसिक आरोग्य, तणावमुक्ती आणि गर्भसंस्कार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गर्भसंस्काराचे महत्त्व आणि सकारात्मक विचार यावरही तज्ज्ञांनी माहिती दिली. त्याचबरोबर गर्भ धारणेपासून म्हणजेच पहिला महिना ते नववा महिना यामध्ये आहार, विविध रक्त व सोनोग्राफी तपासणी आणि व्यायाम याबाबत मार्गदर्शक माहिती पत्रक अनावरण करण्यात आले व त्याचे सर्व गर्भवती महिलांना वाटप करण्यात आले. गर्भावस्थेच्या विविध टप्प्यांवर सोनोग्राफी करणे महत्त्वाचे असून, सातव्या आणि नवव्या महिन्यातील सोनोग्राफीद्वारे गर्भाशयातील पाण्याचे प्रमाण, बाळाचे वजन, वाढ आणि अपेक्षित प्रसूतीच्या कालावधीची माहिती मिळते. पहिल्या वैद्यकीय भेटीत रक्तातील हिमोग्लोबिन, रक्तगट आणि रक्तातील साखरेची तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच आवश्यकतेनुसार रक्तातील संसर्गविषयक आणि लघवीतील संसर्गाची तपासणी करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांमध्ये रक्ताची कमतरता असल्यास बाळाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आढळल्यास वेळेत वैद्यकीय उपचार घेण्यासोबतच योग्य आणि पोषक आहार घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले. कार्यशाळेत उपस्थित गरोदर महिला व त्यांच्या कुटुंबीयांनी विचारलेल्या आरोग्यविषयक प्रश्नांना तज्ज्ञांनी उत्तरे देत शंकांचे निरसन केले.

COMMENTS