गेवराई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी राज्

गेवराई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक व राष्ट्रीय कर्तव्य बजावले.
या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री बदामराव पंडित, भाजप नेते बाळराजे पवार, नायब तहसीलदार कट्टे साहेब, भाजप बीड जिल्हा संघटक युधाजित पंडित, भाजप तालुका समन्वयक श्रीकांत सानप, युवा नेते यशराज पंडित, भाजप मंडळाध्यक्ष उद्धव रासकर, सचिन दाभाडे, राजेश पवार, माजी नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, भाजप गटनेते अॅड. राजेंद्र राक्षसभूवनकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणेश पुजारी, नगर परिषद सभापती शेख शहेदाद, माजी जि. प. सभापती पंढरीनाथ लगड, माजी जिल्हा परिषद सदस्य शामराव राठोड, युवराज डोंगरे, नगरसेवक पिंटूभाऊ काकडे, सय्यद इजहार शेठ, हरबट शेठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, रक्तदान हे श्रेष्ठ दान असून गरजू रुग्णांसाठी ते जीवनदान ठरते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार शेतकरी, शेतमजूर आणि महिलांसाठी विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत आहे. राज्यात रस्ते, पाणीपुरवठा व विकासकामांना गती मिळाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीसारखे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात विकासकामे आणि सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बाळराजे पवार यांनी सांगितले की, आजच्या तरुणांना सामाजिक कर्तव्याची जाणीव असून रुग्णांची गरज ओळखून त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांनी संघटन मजबूत करण्यासाठी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमाला भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरासाठी सिटी ब्लड बँक आणि माजी सैनिक ब्लड बँकेच्या टीमने विशेष सहकार्य केले.

COMMENTS