आष्टी: आषाढी एकादशीनिमित्त हिवरा येथील रोडेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात चिमुकल्या वि

आष्टी: आषाढी एकादशीनिमित्त हिवरा येथील रोडेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळा संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा साकारत ग्रामस्थांना पंढरीच्या विठुरायाचे अप्रतिम दर्शन घडवले. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात निघालेल्या दिंडीमुळे संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते.
वारकरी परंपरेची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये अध्यात्म, संस्कार आणि भक्तीची भावना रुजावी, तसेच ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांनाही दिंडीचा आनंद अनुभवता यावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग, संत एकनाथ महाराजांचे भारुड, गवळणी तसेच फुगडीचे सुंदर सादरीकरण केले. टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण परिसर भक्तीत लीन झाला होता. या पायी दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जात-पात, उंच-नीच असा कोणताही भेदभाव न करता समता, बंधुता आणि एकात्मतेचा सामाजिक संदेश दिला.
त्यानंतर ही दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून फिरली. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे जंगी स्वागत करत विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांचे औक्षण व पूजन केले. गावातील महिलांनीही पारंपरिक पद्धतीने दिंडीचे स्वागत करून या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

COMMENTS