शेवगाव: कारगिल विजय दिन हा भारताच्या इतिहासातील अभिमानाचा, शौर्याचा आणि बलिदानाचा दिवस आहे. या दिवशी कारगिलच्या रणांगणात आपल्या प्राणांची पर्वा न

शेवगाव: कारगिल विजय दिन हा भारताच्या इतिहासातील अभिमानाचा, शौर्याचा आणि बलिदानाचा दिवस आहे. या दिवशी कारगिलच्या रणांगणात आपल्या प्राणांची पर्वा न करता मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना संपूर्ण देश कृतज्ञतेने अभिवादन करतो. परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, शेवगाव तालुक्यात यंदा कारगिल विजय दिनानिमित्त लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या वतीने कोणताही भव्य, सर्वसमावेशक शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. याबद्दल माजी सैनिक संघ शेवगाव तालुक्याने तीव्र नाराजी आणि निषेध व्यक्त केला आहे.
मागील वर्षी माजी सैनिक संघ शेवगाव तालुक्याच्या वतीने भव्य तिरंगा रॅली, शहीदांना मानवंदना, देशभक्तिपर कार्यक्रम आणि नागरिकांचा मोठा सहभाग असलेला प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक झाले होते. मात्र, अशा राष्ट्रीय गौरवाच्या दिवसाची जबाबदारी केवळ माजी सैनिकांवर सोडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अलिप्त राहणे हे अत्यंत खेदजनक आहे.
कारगिल युद्धात प्रत्यक्ष लढलेले आणि देशसेवेसाठी आयुष्य अर्पण केलेले अनेक माजी सैनिक आज शेवगाव तालुक्यात वास्तव्यास आहेत. उनके सन्मानार्थ आमदार, नगराध्यक्ष, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि इतर शासकीय विभागांनी संयुक्तपणे भव्य कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित होते. तसे न होणे ही केवळ प्रशासकीय त्रुटी नसून देशासाठी लढलेल्या वीरांविषयीची उदासीनता दर्शवणारी बाब असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली.
कारगिलचे वीर आपल्या प्राणांची आहुती देत असताना त्यांनी कोणताही स्वार्थ पाहिला नाही. त्यामुळे आज त्यांच्या शौर्याची आठवण ठेवणे, त्यांच्या बलिदानाचा सन्मान करणे आणि नव्या पिढीपर्यंत देशभक्तीचा संदेश पोहोचवणे ही प्रत्येक लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे.
माजी सैनिक संघ शेवगाव तालुका प्रशासनाला जाहीर आवाहन करीत आहे की, भविष्यात कारगिल विजय दिनासह सर्व राष्ट्रीय दिवस माजी सैनिकांच्या सन्मानाने, शासकीय पुढाकारातून आणि सर्व समाजघटकांच्या सहभागाने साजरे करण्यात यावेत. अन्यथा या राष्ट्रीय प्रश्नावर संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा विचार करेल.
कारगिलच्या वीरांचे शौर्य विसरणारा समाज कधीच सक्षम राष्ट्र घडवू शकत नाही. वीरांचा सन्मान हा केवळ एक कार्यक्रम नसून, तो राष्ट्राप्रती असलेली कृतज्ञता आणि आपल्या संस्कारांचे प्रतीक आहे.

COMMENTS