Homeताज्या बातम्या

’आनंदाचे डोही, आनंद तरंग’ : स्वरांतून अवतरला विठ्ठलभक्तीचा उत्सव; नांदेडात भक्तिसंगीत सोहळा उत्साहात

नांदेड: अशोकनगर गृहनिर्माण संस्था, हनुमान मंदिर ट्रस्ट आणि नंदिग्राम संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आनंदाचे डोही आनंद तरंग' या भक्ति

कारगील विजय दिनानिमित्त वीर योद्ध्यांना श्रद्धांजली; राष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून शहीद वीरांना कृतज्ञ अभिवादन
महादजी शिंदे विद्यालयात रंगला रिंगण सोहळा; आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथ दिंडी व वारकरी परंपरेचे भक्तिमय दर्शन
मुक्त पत्रकारितेच्या शिरपेचात मानाचा सातवा तुरा

नांदेड: अशोकनगर गृहनिर्माण संस्था, हनुमान मंदिर ट्रस्ट आणि नंदिग्राम संगीत सभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ या भक्तिसंगीत सोहळ्याने शनिवारी सायंकाळी अशोकनगर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला. संतवाङ्मयातील अभंग, विठ्ठलनामाचा गजर आणि दत्तगुरूंच्या नामस्मरणाने स्वरांची अशी सुरेख मैफल रंगली की प्रत्येक श्रोता भक्तिभावाच्या सागरात चिंब न्हाऊन निघाला.

कार्यक्रमाची सुरुवात अशोकनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष आनंद जवादवार, हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय गोळेगांवकर, निवृत्त सनदी अधिकारी शरद इनामदार, दिपक कासराळीकर आणि गिरीश देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर डॉ. रेश्मा डोईफोडे यांनी ‘ॐकार प्रधान’ या मंगलाचरणातून भक्तिमय वातावरणाची निर्मिती केली. पुढे त्यांनीच सादर केलेल्या ‘खेळ मांडियेला’ या अभंगाने वारकरी परंपरेतील आध्यात्मिक आनंद श्रोत्यांच्या अंतःकरणात जागविला.

वंदना कानडखेडकर यांनी ‘मोगरा फुलला’ आणि ‘विठ्ठल तो आला आला’ या भावस्पर्शी रचनांमधून भक्तीची कोमलता सुरांतून खुलविली. धनंजय नलबलवार यांनी ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ आणि ‘विठु माऊली तू’ या गीतांतून वारकर्‍यांच्या अखंड श्रद्धेचा भाव आपल्या दमदार व पहाडी आवाजाने जिवंत केला. सुनील गुरु यांनी ‘या या पंढरपुरात’ आणि ‘गेला हरी कुण्या गावा’ या रचनांतून विठ्ठल भेटीची उत्कट ओढ सुरेलपणे व्यक्त केली.

प्रणाली देशमुख यांनी ‘अबिर गुलाल’ आणि ‘कानडा राजा पंढरीचा’ या लोकप्रिय अभंगांनी सभागृहात भक्तीचा रंग उधळला. राजेश कानडखेडकर यांनी ‘जैसे ज्याचे कर्म तैसे’ आणि ‘मला हे दत्तगुरू दिसले’ या गीतांमधून कर्मयोग आणि दत्तभक्तीचा गूढ अर्थ उलगडून दाखविला. गिरीश देशमुख यांनी ‘आकाशी झेप घे रे’ आणि ‘शोधीशी मानवा’ या विचारप्रधान गीतांमधून आत्मशोधाचा संदेश दिला. गजानन चिद्रावार यांनी ‘नाम तुझे घेता देवा’ आणि ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या रचनांद्वारे विठ्ठलनामाचे सामर्थ्य प्रभावीपणे मांडले.

डॉ. सुनिता देशपांडे यांनी ‘हरी सुंदर नंद मुकुंदा’ आणि समारोपाला ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ हे गीत कोरससह सादर करून संपूर्ण सभागृह भक्तिरसाने भारावून टाकले. मयुरी कुलकर्णी यांनी ‘अमृताहूनी गोड’ आणि ‘विश्वाचे आर्त’ या गीतांतून भक्ती, करुणा आणि विश्वकल्याणाचा संदेश सुरेल स्वरांतून व्यक्त केला.

प्रत्येक गायकाने आपल्या आवाजातील माधुर्य, भावपूर्ण सादरीकरण आणि संतवाङ्मयातील आशय यांचा अप्रतिम संगम साधत रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे ओघवते निवेदन डॉ. भाग्यश्री चिमकोडकर यांनी केले. या सोहळ्याला अशोक जवादवार, सुभाष देव, दिगंबरराव देशमुख, बापूसाहेब देशमुख, किरण जवादवार, रविंद्र बंडेवार, डॉ. सुनील कुलकर्णी, आनंद माळाकोळीकर, विजय पांडे आणि प्रकाश देशपांडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, संगीतप्रेमी व रसिकांची मोठी उपस्थिती होती.

COMMENTS