बीड: युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ.
बीड: युवकांना सामाजिक परिवर्तनासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे, युवक क्रांती दलाचे (युक्रांद) संस्थापक आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांना जनक्रांती अभियानाच्या वतीने शुक्रवारी (दि. २४ जुलै) बीड येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दादासाहेब मुंडे होते.
यावेळी प्रमुख वक्त्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, डॉ. सप्तर्षी यांनी महाराष्ट्रातील शेकडो युवकांना नेतृत्वाची संधी दिली. अन्याय, अत्याचार आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी १९६७ मध्ये युवक क्रांती दलाची स्थापना केली. त्यांच्या नेतृत्वामुळे हजारो तरुण सामाजिक चळवळींशी जोडले गेले.
प्रा. मोराळे यांनी सांगितले की, १९७० मध्ये प्रा. सुंदर गव्हाणे यांनी मराठवाड्यात युवक क्रांती दलाची स्थापना केली. जनार्दन तुपे यांच्याकडे जिल्हा कार्यवाहाची जबाबदारी तर स्वतःकडे सरचिटणीसपद सोपविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संघटना उभारण्याचे काम करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या की, दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाढीसाठी झालेल्या आंदोलनात युवक क्रांती दलाने दलित पँथरच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष केला. तसेच १९७४ च्या मराठवाडा विकास आंदोलनात, एसटी भाडेवाढविरोधी आंदोलनात आणि मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातही युक्रांदने सक्रिय सहभाग नोंदविला. डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीचे मोठे नुकसान झाले असून त्यांची उणीव कायम जाणवत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास प्राचार्य सविता शेटे, प्रा. पंडित तुपे, अमर शेख, संगमेश्वर आंधळकर, दिनकर तांदळे, बाळासाहेब गोरे, राजेंद्र आमटे, शफिकभाऊ, सुहास जायभाये, अविनाश डरफे, डॉ. संजय तांदळे, शेख आदनान, विजय घेवारे, ज्योतीराम हुरकुडे, पोपट जगताप, गणेश मस्के, सय्यद मुसा, सय्यद अब्दुल करीम, नितीन जायभाये यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली सभेच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन केले.

COMMENTS