किनवट: किनवट शहरात अवैध धंद्यांचे कर्दनकाळ ठरलेले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या संयुक्त धडक कारवायां

किनवट: किनवट शहरात अवैध धंद्यांचे कर्दनकाळ ठरलेले उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर कदम आणि पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या संयुक्त धडक कारवायांनी मटका, जुगार, गुटखा आणि बेकायदेशीर दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. या खाकीच्या धाकाने शहरातील गल्लीबोळांतील गुन्हेगारांचे बिर्हाड उघड्यावर आले असून, खाकी वर्दीचा मान-सन्मानही उंचावला आहे. मात्र, इकडे ‘सिंघम’ची कारवाई आणि तिकडे सीमेवर ‘सेफ झोन’, असा अजबच प्रकार सध्या समोर येत आहे.
किनवट शहर आणि परिसरातील अवैध धंद्यांना चाप बसल्याने, मटका व जुगाराचे मुख्य केंद्र आता लगतच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यांतर्गत येणार्या उमरखेड तालुक्यातील दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हलवले गेले आहे. खरबी शिवारात अगदी पैनगंगा नदीच्या तिरावरील शेतांमध्ये एक मोठा जुगार अड्डा मांडला गेला आहे. मुख्य रस्त्यावरच खुलेआम मटका सुरू असून, या परिसरात जणू काही ‘अवैध धंद्यांची जत्रा’ भरल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे.
चर्चेनुसार, दराटी पोलीस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने या राजरोस चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यासाठी ‘अर्थपूर्ण’ तडजोड केली आहे. पोलिसांच्या या मुकसंमतीमुळे जुगारी अन् मटका चालकांचे चांगलेच फावले असून, दुसरीकडे मात्र अनेक गरिबांचे संसार रस्त्यावर येत आहेत. एका बाजूला नांदेड पोलीस प्रशासनाची कौतुकास्पद कारवाई आणि दुसरीकडे यवतमाळच्या सीमेवरील ही ‘मेहरबानी’, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेर उडाले आहेत.
पैनगंगा नदीच्या पैलतीरावर सुरू असलेल्या या काळ्या धंद्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून, दराटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या अड्ड्यांवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

COMMENTS