कर्जत: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अळसुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेली बालदिंडी भक्तिमय वातावरणात पार पडली. पारंपरिक

कर्जत: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अळसुंदे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आलेली बालदिंडी भक्तिमय वातावरणात पार पडली. पारंपरिक वेशभूषेतील बालवारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात गावातून दिंडी काढत वारकरी संप्रदायाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांना संतांचे जीवनचरित्र, त्यांचे समाजप्रबोधनपर कार्य, मानवतेचा संदेश आणि “माणसाने माणसाशी प्रेमाने व आदराने कसे वागावे” याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संतांच्या विचारांची ओळख करून देत विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिंडीच्या विसाव्याच्या ठिकाणी सरपंच जिजाबापू अनारसे, माजी उपसरपंच जीवन साळुंके तसेच अनिल गाडे यांनी वारकरी आणि विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन केले. यावेळी अळसुंदे गावचे सुपुत्र व उद्योजक नवनाथ गदादे यांनी उपस्थित सर्व वारकरी आणि ग्रामस्थांना ड्रायफ्रूटचे पाकीट व स्टेनलेस स्टीलच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील युवकांनी मोलाचे सहकार्य केले. अंकुश सुखसे, पोपट नागवडे, रमेशदादा अनारसे आणि यादवराव साळुंके यांनी भजन, गायन व वादनातून कार्यक्रमात भक्तिरसाची उधळण केली.
समारोपावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच ड्रायफ्रूट व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करणाऱ्या सर्व दात्यांचा व मान्यवरांचा विशेष सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर साळुंके, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष हरिभाऊ गदादे, ग्रामस्थ, पालक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS