जम्मू: सततचा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सहा दिवस स्थगित ठेवण्यात आलेली वार्षिक अमरनाथ यात्रा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. जम्मू येथी


जम्मू: सततचा पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे सहा दिवस स्थगित ठेवण्यात आलेली वार्षिक अमरनाथ यात्रा शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. जम्मू येथील भगवती नगर तळामधून सहा लाखांहून अधिक भाविकांना कडक सुरक्षा व्यवस्थेत काश्मीरमधील बालटाल तळाकडे रवाना करण्यात आले.
मुसळधार पाऊस, भूस्खलन आणि दगड कोसळण्याच्या घटनांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून १९ जुलैपासून यात्रा थांबवण्यात आली होती. अमरनाथच्या पवित्र गुहेकडे जाणारे अनंतनाग जिल्ह्यातील पारंपरिक पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालटाल मार्ग या दोन्ही मार्गांवर निर्बंध घालण्यात आले होते.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात्रेच्या १८ व्या तुकडीत एकूण ६ हजार २६९ भाविकांचा समावेश आहे. त्यामध्ये १ हजार ४७० महिला, २५ बालके आणि ५४ साधू आहेत. पहाटे सुमारे अडीच वाजेच्या सुमारास २२३ वाहनांच्या ताफ्यासह ही तुकडी बालटाल तळाकडे रवाना झाली. सध्या पहलगाम मार्गावरून कोणताही ताफा पाठवण्यात आलेला नाही.
उधमपूर-रामबन परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तीन दिवस वाहतुकीसाठी बंद होता. हवामानात सुधारणा झाल्यानंतर महामार्ग पुन्हा सुरू करण्यात आला आणि त्यानंतर यात्रेलाही हिरवा कंदील मिळाला. यंदाच्या यात्रेची सुरुवात २ जुलै रोजी झाली होती, त्यावेळी नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मूमधील भगवती नगर तळावरून पहिल्या तुकडीला रवाना केले होते.
यंदाच्या यात्रेची सांगता रक्षाबंधनानिमित्त २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. आतापर्यंत सुमारे चार लाख भाविकांनी अमरनाथच्या पवित्र गुहेचे दर्शन घेतले आहे. त्यापैकी सुमारे एक लाख २० हजार भाविकांनी जम्मूमधील भगवती नगर तळावरून यात्रेला प्रारंभ केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

COMMENTS