अहिल्यानगर: भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित जगदंबा विद्यालय, केडगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन

अहिल्यानगर: भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित जगदंबा विद्यालय, केडगाव येथे आषाढी एकादशी निमित्त भक्तिमय दिंडीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या दिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंग, वीणा, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठल-रुक्मिणी यांच्या विलोभनीय वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
“ज्ञानोबा-तुकाराम” आणि “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या जयघोषाने संपूर्ण केडगाव परिसर भक्तिमय झाला होता. विद्यार्थ्यांनी विविध अभंग, भारुडे, फुगडी, लेझीम तसेच पारंपरिक वारकरी संस्कृतीचे मनमोहक दर्शन घडविले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संत परंपरा, वारकरी संप्रदाय, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक जयसिंग दरेकर, शिक्षक शरद मंडलिक, अशोक हराळ, आबासाहेब नेहूल, सवाईमूल रूपा, सविता कांबळे, अमित अवधूत, पवार कैलास यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या भक्तिमय दिंडीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्म, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांविषयी जागरूकता निर्माण झाली असून परिसरातील नागरिकांनी व उपस्थितांनी या सोहळ्याचे कौतुक केले.

COMMENTS