ग्लासगो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने अखेर पदकाचे खाते उघडले. पॅरा-पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील पुरुषांच्या जड वजनी गटात झंडू क

ग्लासगो: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारताने अखेर पदकाचे खाते उघडले. पॅरा-पॉवरलिफ्टिंग स्पर्धेतील पुरुषांच्या जड वजनी गटात झंडू कुमार याने कांस्यपदक पटकावून भारताला पहिले मान मिळवून दिले. याशिवाय जलतरण, मुष्टीयुद्ध आणि इतर क्षेत्रांतही भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत पुढील फेऱ्यांमध्ये प्रवेश केला.
२८ वर्षीय झंडू कुमार याने १८१ आणि १९० किलो वजन यशस्वीरीत्या उचलून १३०.९ गुणांची नोंद केली. त्याचा १९६ किलो वजन उचलण्याचा अखेरचा प्रयत्न मात्र अपुरा ठरला; तरीही त्याने कांस्यपदकावर आपले नाव कोरले. याच स्पर्धेत भारताचा दुसरा खेळाडू सुधीर ११४.१ गुणांसह सहाव्या स्थानावर राहिला. नायजेरियाच्या इद्रिस रिलवान याने सुवर्णपदक, तर मॅथ्यू हार्डींग याने रौप्यपदक जिंकले.
पुरुषांच्या हलक्या वजनी गटातील पॅरा शक्तीउचल स्पर्धेत भारताचे पदक थोडक्यात हुकले. अशोक मलिक १४३.८ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला, तर परमजीत कुमार १३५.६ गुणांसह सातव्या क्रमांकावर राहिला. जलतरणात पुरुषांच्या १०० मीटर मुक्त शैली एस-१३ प्रकारच्या अंतिम फेरीत कार्तिक बुडिनीगिना याने ५७.५७ सेकंदांची वेळ नोंदवत चौथे स्थान मिळवले. त्यामुळे भारताचे आणखी एक पदक अगदी थोडक्यात हुकले. याच स्पर्धेत इमाम अली सातव्या स्थानावर राहिला.
मुष्टीयुद्धात जादू मणी सिंग याने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटातील पहिल्या सामन्यात स्कॉटलंडच्या आरोन कलन याचा एकतर्फी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुढील फेरीत त्याची गाठ पाकिस्तानच्या सुमामा रहमान याच्याशी पडणार आहे. जलतरणातील पुरुषांच्या ५० मीटर पाठीमागील शैली प्रकारात श्रीहरी नटराज याचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला. त्याने २५.२९ सेकंदांची वेळ नोंदवली; मात्र अंतिम फेरी गाठण्यात त्याला यश आले नाही.
पदकतालीकेत भारत नवव्या स्थानावर
झंडू कुमारच्या कांस्यपदकामुळे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालीकेत नववे स्थान मिळवले आहे. भारताच्या खात्यात सध्या एक कांस्यपदक असून स्पर्धेच्या सुरुवातीलाच अव्वल १० देशांमध्ये स्थान मिळवण्यात भारतीय पथकाला यश आले आहे. एकूण १३ पदकांसह ऑस्ट्रेलिया पदकतालीकेत आघाडीवर असून स्पर्धेत ७४ देश सहभागी झाले आहेत.
झंडू कुमारचे पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या पॅरा-पॉवरलिफ्टर झंडू कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. समाजमाध्यमांवरील आपल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी झंडू कुमार यांच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करताना, त्यांच्या यशामागे प्रचंड जिद्द, अढळ निर्धार आणि अनेक वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत असल्याचे नमूद केले. कठोर परिश्रम आणि शिस्तबद्ध सरावाच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा सन्मान उंचावल्याचेही त्यांनी म्हटले. प्रत्येक आव्हानावर मात करत झंडू कुमार यांनी देशाचे नाव अभिमानाने उज्ज्वल केले आहे. त्यांची ही कामगिरी देशातील असंख्य खेळाडू आणि तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी असून, भविष्यातही ते अशाच यशाची परंपरा कायम ठेवतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

COMMENTS